
‘दोन्ही ठाकरे बंधूंनी एकदा काय तो निर्णय घ्यावा’ - सुधीर मुनगंटीवार
मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक नेत्यांचे राज्यातील विविध भागांत दौरे सुरू असून पक्ष संघटनेचा आढावा घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मागील काही महिन्यांपासून बैठकांचा धडाका लावला आहे. पण मागील काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे.
असं असताना आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अनिल परब आणि संजय राऊत हे देखील उपस्थित असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, आगामी महापालिका निवडणूक तोंडावर असताना ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या घडामोडींवर आता भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत खोचक प्रतिक्रिया दिली. ‘दोन्ही ठाकरे बंधूंनी एकदा काय तो निर्णय घ्यावा’, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
“मला वाटतं की एकदा त्यांनी (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) काय तो निर्णय घेऊन टाकावा. राज ठाकरे कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेले की लगेच बातम्या होतात. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र भेटले की लगेच बातम्या होतात. कोणाचाही काही आक्षेप नाही. त्यांनी (ठाकरे बंधू) एकत्र यावं. एकत्र येऊन त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवावी”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे आणि मी आम्ही राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलो होतो. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. काहीही राजकारण नव्हतं. सत्य असं आहे की गणपतीच्या वेळेला उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेले होते. त्यावेळी राज ठाकरेंच्या आई म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या मावशी/ काकी यांनी निघताना उद्धव ठाकरेंना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही, तेव्हा तू परत ये मला भेटायला. त्यानुसार कुंदामावशींना भेटायला आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले होते. आज का भेटले ते तुम्हाला मी सत्य सांगितलं आहे. कारण मी जे सांगितलं ते सत्य सांगितलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे”, असंही संजय राऊत म्हणाले.
प्रकाश महाजनांनी काय म्हटलं?
“ठाकरे बंधू आज एकत्र आले याचा मला आनंद आहे. दोन महिने झाले असतील मी म्हटलं होतं की महाराष्ट्र हितासाठी या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे. ते एकत्र नाही आले तर इतिहास त्यांना माफ करणार नाही. माझ्या स्पष्ट बोलण्याचा मला त्रास झाला, प्रायश्चित्तही घ्यावं लागलं. दोन भावांमध्ये संवाद निर्माण झाला आहे ही चांगली गोष्ट आहे.” असं प्रकाश महाजन म्हणाले.