
छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; 'देवगिरी' बंगल्यावर राष्ट्रवादीची तातडीने बैठक
बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
Edit
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाजावर
अन्याय होईल, या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व
मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि.३) मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला.
त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महायुतीत अडचणी
वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तातडीने बैठक बोलावली आहे. आज देवगिरी या सरकारी निवासस्थानी ही बैठक होणार असून त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत. महायुती सरकारमध्ये मंत्री भुजबळ यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होत असल्याचे सूत्रांकडून कळते.
पक्षाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा त्यांचा ठाम आरोप असून याबाबत वरिष्ठ पातळीवर गंभीर चर्चेची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे होणारी बैठक महत्त्वाची मानली जात आहे.