
अरुण गवळी १८ वर्षांनंतर कारागृहाबाहेर, नागपूरहून विमानाने मुंबईकडे रवाना
नागपूर : दगडी चाळीचा अनभिषिक्त सम्राट राहिलेला कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी अखेर १८ वर्षांनंतर कारागृहाबाहेर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर त्याची नुकतीच सुटका केल्याने नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून तो आज (दि. ३) बाहेर आला आहे.
नागपूर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेले. माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता थेट अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात ‘डॅडी’ उर्फ अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला होता. वय वर्षे ७७ असल्याने आणि बरीचशी जन्मठेपेची शिक्षा भोगलेली असल्याने, आपली शिक्षा स्थगित करण्याबाबत त्याने केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. अर्थातच त्याला अनेकदा संचित रजा मिळाली, आता कायम सुटकेचा दिलासा मिळतो का, हे फेब्रुवारी महिन्यातच कळणार आहे.
कमलाकर जामसांडेकरची केली होती हत्या, नेमकं प्रकरण काय?
मार्च २००७ मध्ये मुंबईतील घाटकोपरमधील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. निवासस्थानी टीव्ही बघत बसलेल्या कमलाकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. पोलीस तपासात या हत्येची सुपारी अरुण गवळीने दिल्याचे उघड झाल्यानंतर मे २००८ मध्ये गँगस्टर गवळीला अटक करण्यात आली. मुंबईतील न्यायालयाने अरुण गवळीला याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही हा निकाल कायम ठेवल्याने गवळीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. गुरुवारी सुप्रीम कोर्टात गवळींच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने गवळीला जामीन मंजूर केला होता.