
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात जमा, मुख्यमंत्र्यांची माहिती
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किसान सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली. याअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रूपये मिळतात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे देत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी २० वा हफ्ता दिला. यानंतर आज आपणही नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले, असं ते म्हणाले.
अजित पवार आणि आयपीएस अधिकारी वादावर काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील वादावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या प्रकरणाची सर्व माहिती आणि अहवाल माझ्याकडे आलेला नाही, त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. अजित पवार यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. खूपवेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे, याची कल्पना नसते. अनेकवेळा आमच्याकडे आलेल्या निवेदनावर आम्ही कारवाई करा, अस लिहितो. पण निवेदनात सांगितलेली परिस्थिती आणि प्रत्यक्षातील वस्तूस्थिती वेगळी असते. अशावेळी अधिकारी खरी परिस्थिथी नजरेस आणून देतात. अजित पवार यांनी खुलासा केला आहे. मी स्वत: या प्रकरणाचा रिपोर्ट मागितला आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.