महाराष्ट्राच्या शिवम लोहकरे ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम
नीरज चोप्राच्या यशानंतर भारताच्या भालाफेकीतील भविष्य उज्वल दिसत आहे.
महाराष्ट्राच्या शिवम लोहकरेने ८४.३१ मीटर भाला फेकून नीरजचा विक्रम मोडला.
नीरजनेही शिवमला शाबासकी दिली आहे.
नीरज चोप्राने आत्तापर्यंत भारताला भालाफेकीमध्ये मोठे यश मिळवून दिले आहे. त्याने अनेक मोठी पदके जिंकली असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकालाही गवसणी घातली. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
त्याच्या यशानंतर भारताचे भालाफेकीतील भविष्य उज्वल दिसत असून वेगवेगळ्या भागातील खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. नुकतेच महाराष्ट्राच्या अहमदनगरमधील सोनाई गावातील शिवम लोहकरे याने नीरजचाच विक्रम मोडला आहे.
नुकतीच ७४ वी इंटर सर्व्हिस ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धेत २० वर्षीय शिवमने ८४.३१ मीटर लांब भाला फेकला. त्यामुळे त्याने नीरजने २०१८ मध्ये नोंदवलेल्या विक्रमाला मोडले. नीरजने २०१८ मध्ये ८३.८० मीटर लांब भाला फेकला होता. शिवमने सर्वात लांब भाला फेकणारा युवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
दरम्यान शिवमने सलग चौथ्यांदा ८० मीटरचे अंतर पार केले आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंडियन ओपन ऍथलेटिक्स मीटमध्ये ८०.९५ मीटर लांब भाला फेकला होता. लहान वयातच ८० मीटरचं अंतर तो सातत्यान पार करत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
मात्र विक्रमाची होणार नाही नोंद
दरम्यान शिवमने जरी ८४.३१ मीटर लांब भाला फेकला असला तरी अधिकृतरित्या त्याची नोंद वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये होणार नाही. कारण या स्पर्धेला अधिकृत मान्यता नाही. पण तरी शिवमने केलेल्या या कामगिरीमुळे सर्वत्र मोठी दाद मिळाली आहे.
नीरजकडूनही मिळाली शाबासकी
शिवमने त्याच्या ८४.३१ मीटर फेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर नीरजने स्वत: कमेंट केली आहे. त्याने लिहिले की 'शिवम अभिनंदन. खूप मस्त. अशीच कामगिरी करत राहा.' आता शिवमकडून यापुढेही मोठ्या अपेक्षा असणार आहेत.