बाळासाहेब ठाकरे हयात असताना हे दोघं एकत्र आले असते तर खूप चांगलं झालं असतं; राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर स्मिता ठाकरेंचं भाष्य

बाळासाहेब ठाकरे हयात असताना हे दोघं एकत्र आले असते तर खूप चांगलं झालं असतं; राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर स्मिता ठाकरेंचं भाष्य

 

मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विजयी मेळाव्याच्या दरम्यान ५ जुलैला एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं. वरळी या ठिकाणी झालेल्या या विजयी मेळाव्यात दोन्ही भावांची राजकीय भाषणं लक्षवेधी ठरली. खरंतर दोघंही एकत्र येतील या चर्चांना उधाण आलं होतं ते एप्रिल महिन्यात राज ठाकरेंनी दिलेल्या एका मुलाखतीनंतर. राज ठाकरेंना तातडीने उद्धव ठाकरेंनी प्रतिसादही दिला होता. दरम्यान या दोन्ही भावांच्या भेटीगाठीही वाढल्याचं दिसून आलं. राज ठाकरे मातोश्रीवर गेले. उद्धव ठाकरे दोनदा शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले. आता दसरा मेळाव्यात या दोघांच्या युतीची घोषणा होईल अशी चर्चा आहे. दरम्यान ठाकरे बंधूंबाबत ठाकरे घराण्याच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

दोन महिन्यांत चार वेळा ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही मागील २० वर्षांपासून असलेले त्यांचे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येताना दिसत आहेत. पुढच्या काही महिन्यात मुंबईसह अन्य महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवू शकतात. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याचंही स्थानिक पातळीवर दिसून येतं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्यावाचून दोन्ही ठाकरेंकडे पर्याय नाही अशीही एक चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी घसरण झाली. दोघांचा जनाधार घटल्याच दिसलं. त्यामुळे आगामी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक दोन्ही बंधुंसाठी महत्त्वाची मानली जाते आहे. दरम्यान स्मिता ठाकरेंनी आता या दोघांबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

स्मिता ठाकरे या ठाकरे बंधूंबाबत काय म्हणाल्या?

कुटुंब म्हणून मी हे म्हणते आहे की दोन भाऊ एकत्र येत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. पण माझं म्हणणं इतकंच आहे की बाळासाहेब ठाकरे हयात असताना हे दोघं एकत्र आले असते तर खूप चांगलं झालं असतं. बाळासाहेब ठाकरेंना या दोघांनी एकत्र येण्याचा खूप आनंद झाला असता. असं स्मिता ठाकरे म्हणाल्या. टीव्ही ९ मराठीशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी स्मिता ठाकरेंनी हे भाष्य केलं.

२ ऑक्टोबरला काय होणार?

२ ऑक्टोबरला शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना बोलवलं जाणार का? याची उत्सुकता कायम आहे. याचं कारण म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. तसंच राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानापासून अगदी हाकेच्या अंतरावर राहतात. शिवाय ठाकरे बंधूंमध्ये इतक्या वर्षांपासून आलेलं राजकीय अंतरही दूर झालेलं पाहण्यास मिळतं आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी काय होणार? हे पाहणंही महत्त्वाचं आहे.