
दिवे घाटात दरड कोसळली, पावसामुळे दहा ठिकाणी झाडे पडली
पुणे : शहर, तसेच परिसरात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे दहा ठिकाणी झाडे कोसळली. झाडाच्या फांद्या कोसळून एक बस आणि एका रिक्षाचे नुकसान झाले. पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. दरड कोसळल्यानंतर दिवे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली.
शहरात रविवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. रविवारी रात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. शहर, तसेच परिसरात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे दहा ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही. झाडे कोसळण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
शहर, परिसरात सोमवारी संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतुकीचा वेग संथ झाला असून खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. पावसामुळे अनेक जण माेटार घेऊन कामावर निघाले. वाहतूक नियोजनासाठी प्रमुख चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
पावसामुळे पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. दिवे घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे घाटातील डोंगर फोडण्यात आला आहे. ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन डोंगर फोडण्यात आल्याने दगड सैल झाले आहेत. त्यामुळे दिवे घाटात दरड कोेसळण्याच्या घटना यंदा पावसाळ्यात घडल्या आहेत. घाटातून जाणाऱ्या वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घाटातील डोंगर कपारीच्या परिसरात लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. पावसामुळे दिवे घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.