‘…म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो’, अशोक चव्हाणांनी अखेर सांगितलं कारण; म्हणाले…

‘…म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो’, अशोक चव्हाणांनी अखेर सांगितलं कारण; म्हणाले…

 

माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या चव्हाणांनी आपण आयुष्यातील १४ वर्ष वनवास भोगला, मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला तरी मी संपलो नाही असे विधान केले आहे. भाजपाच्या लातूर ग्रामीण कार्यकर्त्यांच्या संकल्प सभेत अशोक चव्हाण बोलत होते.

लातूरचे भाजपाचे आमदार रमेश कराड यांना उद्देशून बोलताना आशोक चव्हाण यांनी आपण काँग्रेसमध्ये असताना वनवास भोगला असे विधान केले . काँग्रेस सोडण्याचे कारण सांगताना चव्हाण म्हणाले की, “रमेशआप्पा म्हणाले की मी सुद्धा फार संघर्षातून पुढे आलेलो आहे. रमेशआप्पा तुम्ही तर या दोन-चार वर्षात संघर्ष करत पुढे आला. मी आयुष्यातील १४ वर्ष वनवास भोगला आहे. १४ वर्षांचा वनवास भोगून आजही मी… राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला, पण मी संपलो नाही. जनता माझ्याबरोबर होती. शंकरराव चव्हाणांची पुण्याई होती, शिवराज पाटील यांची पुण्याई आहे, त्या आशीर्वादाने मी टिकलो. १४ वर्ष वनवास भोगल्यानंतर मग मी निर्णय घेतला… की आता वेळ आलेले आहे…. मी मोदींशी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातील वातावरण बदलतंय. मी भाजपामध्ये येतो. तुमच्या आशीर्वादाने कामही करेन…,” असे अशोक चव्हाण म्हणाले.

सध्या विरोधकांकडून सत्ताधारी भाजपावर सध्या होत असलेल्या वोट चोरीच्या आरोपांवर देखील अशोक चव्हाण यांनी भाष्य केले. विरोधकांकडून खोटे आरोप होत असल्याचे सांगत अशोक चव्हाण म्हणाले की, ” आज विरोधीपक्ष, यूपीएची आज काय आवस्था आहे? नेतृत्वहीन यूपीए झाली आहे. आरोप करायचे तर काय करायचे तर वोट चोरीचा आरोप सुरू झाला. भाजपाने मते चोरली असा आरोप होत आहे. मला सांगा मत चोरायची गरज पडली असती तर अर्चनाताई ७ हजार मतांनी पडल्या असत्या का हो? नाना पटोले अडीचशे मतांनी निवडून आले असते का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.