''ओबीसींचा कट-ऑफ बघा अन् EWSचा बघा...'', धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलले

''ओबीसींचा कट-ऑफ बघा अन् EWSचा बघा...'', धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलले

 

ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल या नैराश्यातून वांगदरी (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील भरत कराड (वय ३५) या तरुणाने आत्महत्या केली. राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

'मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून सरकारने ओबीसींचं आरक्षण संपविलं आहे.. आता ओबीसींच्या आरक्षणाचं काय होईल..' अशी चिंता व्यक्त करत व घोषणा देत बुधवारी सायंकाळी वांगदरी येथील भरत महादेव कराड या तरुणाने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. त्याने ओबीसींच्या आरक्षणाबाबत चिंता व्यक्त करणारी चिठ्ठीदेखील लिहून ठेवली होती. त्यानंतर धनंजय मुंडेंनी शुक्रवारी कराड कुटुंबियांचं सांत्वन केलं.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, आरक्षणाला धोका पोहोचतोय म्हणून एका तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. आरक्षणाच्या आंदोलनात त्याने जीवनाची आहूती दिली. तीन मुली, एक मुलगा, बायको काहीही दिसलं नाही. ही तीव्रता महाराष्ट्रात काही दिवसांपासून पाहतोय.

''ज्यांच्यासाठी हा लढा सुरु आहे, तेच जर असे आत्महत्या करायला लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कुणाला? त्यामुळे कुणीही आततायीपणा करु नये, सरकार सजग आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची जबाबदारी घेतलेली आहे.'' असंही मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे पुढे बोलले की, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जसा शिवाजी महाराजांनी गावकूस घालून दिली होता, तसा गावकूस आता आरक्षणाच्या या वेगवेगळ्या लढ्यात उरलेला नाही. दोन जातींचे जीवलग मित्र एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. काही जिल्ह्यात तर पोलिस डिपार्टमेंटमध्ये पोलिसांना ड्रेसवर आडनाव लावण्याची बंदी आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही.

''एमपीएससीची आता कटऑफ लिस्ट लागली आहे. ओबीसीचा कट ऑफ ४८५ आहे, ईडब्ल्यूएसचा ४४५ आहे. मला प्रश्न पडतो की, ईडब्ल्यूएसमधून ओबीसीमध्ये जे आले त्यांचा फायदा झाला की नुकसान झालं, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. पीडित कुटुंबाला सरकारच्या वतीने मदत करण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे.'' हेही धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं.

धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट

ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल या नैराश्यातून वांगदरी ता. रेणापूर, जि. लातूर येथील स्व. भरत कराड (वय ३५) या तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा ज्येष्ठ नेते ना. छगन भुजबळ यांच्या समवेत वांगदरी येथे जाऊन कराड कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले; यावेळी आ. रमेश कराड यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. स्व. भरत कराड यांच्या अशा टोकाच्या निर्णयाने उघड्यावर पडलेल्या त्यांच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून आपल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली.

आरक्षण प्रश्नी सरकार सजग असून, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, यासाठी संविधानाच्या चौकटीत राहून लढा लढला जाईल, मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर कुणीही आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे कळकळीचे आवाहन आहे. स्व. भरत कराड यांच्या कुटुंबीयांना पुढे कोणतीही मदत लागल्यास आम्ही तत्पर राहू, तसेच शासनाकडून देखील कराड कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी मिळावी यासाठी पाठपुरावा करू.