वाहनांच्या शोरूममध्ये दरकपातीनंतरच्या किंमतींसह पंतप्रधानांचा फोटो लावण्याचे आदेश

वाहनांच्या शोरूममध्ये दरकपातीनंतरच्या किंमतींसह पंतप्रधानांचा फोटो लावण्याचे आदेश

 

केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. जीएसटी परिषदेने ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरीय जीएसटी दररचनेला मंजुरी दिली आहे. तर, १२ टक्के आणि २८ टक्के हे कर दराचे टप्पे रद्दबातल केले आहेत. यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहे. जीएसटीच्या नव्या दरांमुळे वाहन उद्योगालाही फायदा होणार आहे. काही वाहनं स्वस्त होणार असून ग्राहकांचा फायदा होणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने देशभरातील सर्व दुचाकी व चारचाकी वाहन उत्पादक (ऑटोमोबाइल) कंपन्यांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांच्या शोरूम्स व दुकानांमध्ये जीएसटी सुधारणेनंतर वाहनांच्या बदललेल्या किमतींचे पोस्टर लावावेत. जीएसटी सुधारणेपूर्वी वाहनांच्या किमती किती होत्या आणि आता या वाहनांच्या किमती किती आहेत असा फरक दर्शवणारे फलक/पोस्टर्स लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिझनेस स्टँडर्डने सरकारी अधिकारी व वाहन उद्योगांमधील सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

वाहनांच्या शोरूम्समध्ये झळकणार मोदींचे फोटो

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्समार्फत (SIAM) हे आदेश देण्यात आले असून पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सध्या ऑटोमोबाइल कंपन्या सरकारी आदेशांनुसार पोस्टरचे डिझाईन तयार करून मंत्रालयाला मंजुरीसाठी पाठवत आहेत. या मंजुरीनंतर सर्व ऑटोमोबाइल कंपन्यां त्यांच्या शोरूम्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह वाहनांच्या जुन्या-नव्या किमतींचे पोस्टर्स लावतील.

वाहन कंपन्यांमध्यो गोंधळ

केंद्राच्या या आदेशामुळे वाहन उत्पादक कंपन्यां व डीलर्समध्ये गोंधळ उडाला आहे. कारण जीएसटीत कपात झाल्यामुळे वाहनांच्या किमतींवर त्याचा प्रभाव पडणार आहे. परंतु, वाहन उत्पादक कंपन्या व डीलर्समधील खर्चाची विभागणी कशी होणार? त्यानुसार पोस्टर कसे बनवायचे? बहुभाषिक पोस्टर बनवायचे असल्यास प्रत्येक भाषेच्या पोस्टरसाठी वेगळी मंजुरी घ्यावी लागेल का? अशा प्रकारे पोस्टर्स लावण्याचा किंवा अशा उपक्रमाचा वाहन उद्योगाला अनुभव नाही, त्यामुळे वाहन कंपन्या व डीलर्समध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.

यापूर्वी, करोनावरील लसीचं प्रमाणपत्र व पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो झळकल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.