
पुण्यात ५०० कोटी रुपयांचा प्राप्तीकर घोटाळा उघडकीस; बोगस लाभार्थ्यांचा शोध सुरू
पुणे: प्राप्तीकर संचालनालय (तपास) विभागाने पुण्यात बनावट प्राप्तीकर परतावा घोटाळा उघडकीस आणला आहे. प्राप्तीकर भरण्याच्या पूर्वीच्या प्रणालीतील त्रुटींचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात करदात्यांना परतावा मिळवून देण्याचे काम काही व्यावसायिकांनी केल्याचे निदर्शनास आले आहे. प्राप्तीकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ५०० कोटींची फसवणूक करण्यात आहे. अधिकारी आता बोगस लाभार्थ्यांचा शोध घेत आहेत.
प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या काही व्यावसायिकांनी नोकरदारांना रिटर्न स्पेशालिस्ट म्हणून सेवा दिली. करदात्यांना अधिकचा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पाच वर्षांच्या काळात, रिटर्न स्पेशालिस्ट्सनी १० हजारांहून अधिक प्राप्तीकर विवरणपत्रे दाखल केल्याचे समोर आले आहे. प्राप्तीकर विभागातील तपासकर्त्यांच्या निदर्शनास आले की, गृहकर्जावरील व्याज आणि मुद्दल परतफेड, वैद्यकीय आणि विम्याचे हप्ते, बचत योजनांमध्ये गुंतवणूक, शैक्षणिक कर्ज आणि घरभाडे याबद्दल कोणतीही सहाय्यक कागदपत्रे न दाखवत वजावटीचा दावा करण्यात आला. आता नव्या प्रणालीत ही त्रुटी दुरूस्त करण्यात आली आहे.
प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही या दाव्यांची तपासणी सुरू आहे. घोटाळा झालेल्या प्रकरणांमध्ये एक प्रकारचे साम्य आढळून येत आहे. अधिकारी पुढे म्हणाले की, आम्ही कथित रिटर्न स्पेशालिस्टवर कारवाई केली आहे आणि आता बोगस कर परतावा मिळविणाऱ्या वैयक्तिक लाभार्थ्यांना शोधण्याची मोहीम सुरू आहे. त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांना दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.