श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार

श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार

 

मुंबई: मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वस्त्या-शिवारे जलमय झाली आहेत. सोलापूर, नंदुरबार, आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसाने पुन्हा कहर केला आहे. विदर्भात अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिशय कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी राज्यभरातील नागरिक पूरग्रस्त आणि शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. 

पूरग्रस्तबाधित आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे. राज्यातील सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटीची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले असून, शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १.११ कोटीची मदत देण्यात येणार आहे. यातच मुंबईतील प्रसिद्ध आणि देशातील श्रीमंत मंदिरांच्या यादीतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने अतिवृष्टीबाधितांसाठी मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. 

श्री सिद्धिविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार

श्री सिद्धिविनायक मंदीर न्यासाने मदतीचा निर्णय घेतल्यानंतर कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी याबाबत माहिती दिली. श्री सिद्धिविनायक मंदीर न्यासाकडून अतिवृष्टीबाधीतांच्या मदतीसाठी १० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. हा सर्व निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्रिपाठी यांनी सांगितले. 

दरम्यान, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शेतकरी, पूरग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठवाड्यात जो आलेला महाप्रलय आहे, मराठवाड्यात जे अस्मानी संकट आले आहे. सातत्याने दोन ते तीन दिवस झालेला प्रचंड पावसामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. मोठ्या ओल्या दुष्काळाला शेतकरी, नागरिक सामोरे जात आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ५० लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन लवकरच या रकमेचा धनादेश सुपूर्द करणार आहोत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.