बारामती बँकेने यशाचे शिखर गाठले : अजित पवार
बारामती सहकारी बँकेची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ( ता. 28) अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष नुपूर शहा (वडूजकर), कार्यकारी संचालक विनोद रावळ यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
बारामती सहकारी बँक ही अडचणीतून बाहेर काढण्यात आपल्याला यश मिळाले असे सांगत अजित पवार म्हणाले, मलाही काही काळ बँकेबाबत काळजी वाटत होती, मात्र बँकेच्या सर्वच प्रमुखांनी काही कठोर निर्णय घेत कर्ज वसुली केल्यामुळे आज शून्य टक्यावर बँकेचा एनपी आला आहे, ही बाब गौरवस्पद आहे. कर्जवसूलीसाठी मी देखील अनेकांना फोन केले होते, हेही त्यांनी नमूद केले.
सभासदांनी देखील घेतलेले कर्ज वेळेत परत करणे गरजेचे आहे, बँकेच्या सभासदांनी ज्या काही मागण्या केल्या आहेत, त्याचा बँकेचे संचालक मंडळ निश्चितपणे विचार करेल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
यापुढील वार्षिक सर्वसाधारण सभे अगोदर बँकेच्या प्रमुखांनी बँकेत बसून सभासदांच्या शंकांचे निरसन करावे, जेणेकरून वार्षिक सर्वसाधारण सभेत वेळेची बचत होईल, अशी सूचना अजित पवार यांनी केली. सचिन सातव यांनी ती मान्य करत पुढील वर्षी सभासदांच्या शंकांचे अगोदरच निरसन करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी बारामती बँकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नवीन डेबिट कार्डचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते झाले. बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकेच्या ठेवी 2221 कोटी रुपयांच्या असून 1325 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे, 22300 सभासद असून बँकेच्या राज्यभरात 36 शाखा आहेत. बँकेचे भाग भांडवल 55 कोटी रुपये असून एनपीए शून्य टक्क्यांवर आल्याची माहिती सचिन सातव यांनी याप्रसंगी दिली.
बँकेचे मावळते उपाध्यक्ष विजय गालिंदे यांनी आभार मानले. विनोद रावळ यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.