बारामतीच्या ‘ज्ञानसागर गुरुकुल’कडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल १० लाखांची मदत
बारामती:- महाराष्ट्रातील विविध भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं यंदा त्यांच्या दिवाळी सणावरही परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती येथील ज्ञानसागर गुरुकुल या शाळेचे संस्थापक सागर आटोळे यांनी पुढाकार घेत दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल १० लाखांची मदत देत आधार दिला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत या उपक्रमाला हातभार लावला.
मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. सर्वत्र दिवाळीचा उत्साह असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी यावर्षी दु:खच आल्याचं पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळं सगळं काही संपलं असताना दिवाळीचा आनंदही शेतकऱ्यांपासून हिरावला गेला आहे. त्यामुळंच शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशानं बारामतीतील ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर मानसिंग आटोळे यांनी पुढाकार घेतला.
त्यांच्या या उपक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हातभार लावला. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांनी स्वत:बरोबरच मिळेल तशी मदत मिळवत या उपक्रमात सहभाग घेतला. त्यातून तब्बल १० लाख २१ हजारांची मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आली. यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या शिवार फाउंडेशनला ५ लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख २१ हजार रुपयांची मदत देत या संस्थेने आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
आपल्या अन्नाची गरज भागवणाऱ्या बळीराजाला संकट काळात मदत करत ज्ञानसागर गुरुकुल या संस्थेने समाजात वेगळा पायंडा पाडला आहे. त्यामुळे या संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना ठेवून राबवलेला हा उपक्रम सर्वांसाठीच आदर्शवत ठरणारा आहे.