फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची हॉटेलमध्ये आत्महत्या
सदर महिला डॉक्टर या फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत होत्या. त्या मूळच्या बीड जिल्ह्यातील होत्या. शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये त्यांनी आपले जीवन संपवले. ही घटना कधी आणि नेमकी कशी उघडकीस आली, याबाबतचा तपशील पोलीस तपासात समोर येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टर अविवाहित होत्या. त्या फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने उपजिल्हा रुग्णालय परिसरात आणि शहरातील वैद्यकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
आत्महत्येमागील कारणांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. घटनास्थळावरून काही पुरावे किंवा चिठ्ठी मिळते का, याची पाहणी करण्यात येत आहे. तसेच, हॉटेल व्यवस्थापन, कर्मचारी आणि महिला डॉक्टरच्या निकटवर्तीयांकडे चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.