पुण्यात महिलेने दिलेली भाजी पाहून अजित पवार म्हणाले, “घरी जाऊन बायकोला सांगतो…”

पुण्यात महिलेने दिलेली भाजी पाहून अजित पवार म्हणाले, “घरी जाऊन बायकोला सांगतो…”

 

पुणे: राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार आज (शुक्रवार, १० ऑक्टोबर) पुण्यात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. यावेळी खडकवासला येथील एका महिलेने अजित पवार यांना चक्क शेतातील ताजी भाजी भेट म्हणून दिली. तसेच यंदा पाऊस खूप झाला आहे, सगळीकडे ओला दुष्काळ पडलाय, त्यातही ही भाजी आणलीय असं या महिलेने सांगितलं.

“ही भाजी तुम्हाला आवडते असं आम्हाला समजलं म्हणून तुमच्यासाठी आणली आहे, ही भाजी घरी न्या आणि शिजवून खा” असंही या महिलेने आग्रहाने अजित पवारांना सांगितलं.

महिलेने भाजी दिल्यावर अजित पवार म्हणाले, आता घरी जाऊन बायकोला सांगतो बहिणीने भाजी दिली आहे, आता ही भाजी बनवून मला खाऊ घाल. खडकवासला येथील दत्तनगर परिसरा अजित पवार कार्यकर्त्यांच्या घरी गेले होते. तेथील महिलेने अजित पवार यांना भाजी भेट दिली.

अजित पवारांना भेट म्हणून मिळाली भाजी
अजित पवार दत्तनगर परिसरात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. तेव्हा काही महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी एक महिला अजित पवारांना म्हणाली, “तुमच्यासाठी ही भाजी आणली आहे. यंदा पाऊस खूप पडला आहे, सगळीकडे ओला दुष्काळ आहे. त्यामुळे ही भाजी आणली आहे.”

या महिलेने “आम्ही देखील बारामतीचेच आहोत.” असं सांगितल्यावर अजित पवार यांनी या महिलेला विचारलं की “तुमचं गाव कोणतं?” त्यावर महिलेने ‘लाटे’ (बारामती तालुक्यातील गाव) असं सांगितलं. तसेच तिने तिच्या भावाची अजित पवारांशी ओळख करून दिली.

बायकोला भाजी खाऊ घालायला सांगतो : अजित पवार
ती महिला म्हणाली, “तुम्हाला ही भाजी आवडते म्हणून आवर्जून आणली आहे. ही भाजी शिजवून खा.” त्यावर अजित पवार म्हणाले, “भाजी घरी घेऊन जातो आणि बायकोला सांगतो, माझ्या बहिणीने भाजी दिलीय ती बनवून मला खाऊ घाल. त्यानंतर महिलेने अजित पवारांना त्यांच्या प्रभागाकडे लक्ष देण्याची विनंती देखील केली.”