सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट; म्हणाले, “मी त्यांना शांतपणे…”

सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट; म्हणाले, “मी त्यांना शांतपणे…”

 

नवी दिल्ली: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी (६ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली. राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांचे बार कौन्सिलचे तात्पुरते सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. राकेश किशोर यांच्या कृतीबद्दल देशभरातून टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतली आहे.

खासदार निलेश लंके यांनी आज वकील राकेश किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी वकील राकेश किशोर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलत असताना भेटीमागचा उद्देश सांगितला.

निलेश लंके यावेळी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान निर्माण केले. संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत जो प्रकार घडला, तो एका व्यक्तीचा अवमान नसून संपूर्ण देशाचा अवमान होता. जे कृत्य घडले, त्याचा शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी मी आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत घेऊन येथे आलो आहे.

राकेश किशोर यांच्याकडून घडलेली घटना संकुचित आणि मनुवादी विचारांमधून घडलेली घटना आहे. संविधानाचा त्यांना कुठेतरी त्यांना विसर पडला आहे. त्याची त्यांना पुन्हा जाणीव करून देण्यासाठी मी इथे आलो आहे, असे निलेश लंके यांनी स्पष्ट केले.

राकेश किशोर यांच्यावर कारवाई

दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वकील राकेश किशोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असला तरी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन(SCBA)ने त्यांच्यावर कारवाई केली आहे. वकील राकेश किशोर यांची तात्पुरती सदस्यता रद्द केली आहे, तसेच त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

तसेच राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑल इंडिया अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष भक्तवचल यांच्या लेखी तक्रारीवरून मंगळवारी संध्याकाळी बंगळुरूमधील विधान सौधा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.