
शारदाबाई पवार विद्यालयाचा सामाजिक संदेश, शेतकऱ्यांसाठी २ टन अन्नधान्य
माळेगाव : शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शिवनगर येथे आज सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सुमारे २ टन अन्नधान्याचे पॅकिंग करून वाटप करण्यात आले.
या मदतीमध्ये जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. यामध्ये तेल, साखर, गहू, डाळी, साबण, मसाल्याचे पदार्थ व इतर आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन संगीताताई कोकरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते महेश तात्या कदम, प्राचार्य अंकुश कोकरे, उपप्राचार्य स्वाती भोसले, पर्यवेक्षक पांडुरंग आटोळे, शिक्षक प्रतिनिधी नवनाथ कुंभार तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृत होण्यास मदत झाली असून, शाळेने समाजाशी नातं जोडणाऱ्या कृतीतून एक सकारात्मक उदाहरण निर्माण केले आहे.