माळेगाव कारखान्याचा ₹३४५० अंतिम दर जाहीर

माळेगाव कारखान्याचा ₹३४५० अंतिम दर जाहीर

 

माळेगाव – माळेगाव सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०२४–२०२५ साठीचा अंतिम ऊस दर जाहीर केला असून, सभासद शेतकऱ्यांना ₹३४५० प्रति मे.टन दराने ऊसाचे मूल्य दिले जाणार आहे. गेटकेन धारक शेतकऱ्यांसाठी ₹३२०० प्रति मे.टन दर निश्चित करण्यात आला आहे.

या हंगामात कारखान्याने ११,२१,०७६ मे.टन ऊसाचे गाळप केले असून, ११.८४८ रिकव्हरी प्राप्त झाली आहे. यामुळे एकूण १२,००,६०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.

कारखान्याच्या नियोजन धोरणानुसार, व्हरायटी ऊसास ₹१०० प्रति मे.टन अनुदान आणि खोडवा ऊसास ₹१५० प्रति मे.टन अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सभासदांना एकूण ₹३६०० प्रति मे.टन पर्यंत दर मिळणार आहे.

हंगामातील एफ.आर.पी. ₹३९८८.६४ असून, त्यातून तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता निव्वळ एफ.आर.पी. ₹३१२५ प्रति मे.टन ठरली आहे. यापैकी पहिला हप्ता ₹३१३२ व खोडकी खर्च ₹२०० मिळून एकूण ₹३३३२ प्रति मे.टन अदा करण्यात आले आहेत. गेटकेन धारकांना आजअखेर ₹३१२५ प्रति मे.टन अदा झाले आहेत.

जाहिर केलेल्या अंतिम दरानुसार, उर्वरित देय रक्कम सभासदांना ₹११८ आणि गेटकेन धारकांना ₹७५ प्रति मे.टन प्रमाणे मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अदा केली जाणार आहे.

कारखान्याच्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना २०% बोनस जाहीर करण्यात आला आहे. सभासदांच्या ठेवी व ऐच्छिक ठेवीवरील ₹३,५८,४८,१४९ इतके व्याज नुकतेच त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

सन २०२५–२०२६ च्या हंगामासाठी कारखान्यात अंतर्गत कामे सुरू असून, गळीत वेळेत सुरू करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख प्रयत्नशील आहेत. पर्जन्यमान समाधानकारक असल्यामुळे यंदा अधिक ऊस गाळप करण्याचा मानस कारखान्याचे चेअरमन अजितदादा पवार यांनी व्यक्त केला आहे.

या उच्चांकी दरामध्ये कारखान्याचे सभासद, व्यवस्थापन, तोडणी-वाहतूकदार, कर्मचारी व अधिकारी यांचे मोलाचे योगदान असून, सध्या कारखान्यात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.