सर्वांना निवडणूक लढता यावी म्हणून युती टाळणे योग्य नाही; द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत…

सर्वांना निवडणूक लढता यावी म्हणून युती टाळणे योग्य नाही; द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत…

 

अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती करण्यासंदर्भात आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. पण, ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे युती केली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एखाद्या ठिकाणी युती झाली नाही, तरी मित्र पक्षांवर टीका करू नये, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. महायुती म्हणून या निवडणुकांमध्ये चांगले यश तीनही पक्षांना मिळेल, हा विश्वास आम्हाला आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नेहमीच असते.

परंतु, स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो. केवळ सगळ्यांना निवडणूक लढता यावी, एवढा मर्यादित निर्णय घेता येणार नाही, ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षांसोबत युती करूनच निवडणूक लढविली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अमरावतीत पश्चिम विदर्भ स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारी पदाधिकारी बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण राज्यात विभागनिहाय बैठकांचे नियोजन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषदा, नगर पालिका, नगर पंचायती यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आढावा घेण्यासाठी या बैठका घेण्यात येत आहेत. यापुर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागांचा आढावा घेण्यात आला आहे. आज अमरावती आणि नागपूर विभागाचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील आठवड्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा म्हणून पक्ष सज्ज आहे. कार्यकर्त्यांना दिशानिर्देश देऊन या निवडणुका जिंकण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी मुख्य सचिवांना पत्र पाठवून सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी संघाच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,  प्रियांक खरगे हे प्रसिद्धीकरिता असल्या गोष्टी करत असतात. त्यांना काहीच स्टैंडिंग नाही. ते वडिलांच्या भरवशावर राजकारण करणारे आहेत. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की, अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला, नव्हे बंदी घातली. ज्या इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेहून पायउतार व्हावे लागले.