एमपीएससीकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

एमपीएससीकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

 

सोलापूर : अतिवृष्टी, पूरग्रस्त परिस्थितीमुळे काही परीक्षेच्या वेळापत्रकात एमपीएसीकडून बदल करण्यात आला. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलावी लागली. पुढील वर्षामध्ये घेण्यात येणार्‍या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वार्षिक वेळापत्रक दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात येते. वेळापत्रक प्रसिद्ध करताना आयोगाच्या आणि स्पर्धा परीक्षा घेणार्‍या इतर संस्थांच्या परीक्षा एका दिवशी येणार नाहीत, याचा विचार करून वेळापत्रक निश्चित करण्यात येते. त्यामुळे परीक्षार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा देण्याची संधी मिळते.

आयोगाच्या संकेतस्थळावर स्पष्टीकरण

सन 2025 चे स्पर्धा परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक 22 नोव्हेंबर 2024 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार परीक्षांचे आयोजन करण्याचा आयोगाकडून काटेकोर प्रयत्न करण्यात आला. मात्र, विविध अपरिहार्य कारणांस्तव, उमेदवारांचे हित विचारात घेता काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण आयोगाने संकेतस्थळावर दिले.

या परीक्षा कधी होणार

सन 2025 च्या अंदाजित वेळापत्रकातील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2024 ही परीक्षा शासनाच्या सूचनेनुसार स्थगित ठेवण्याबाबत कळविल्याने या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही, त्यामुळे ही परीक्षा केव्हा होणार, याकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

विशेष तपशील

- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा : 9 नोव्हेंबर

- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 25 : 21 डिसेंबर

- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 25 : 4 जानेवारी 2026