पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

 

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ. वीरेंद्र शरदचंद्र तावडे, शरद भाऊसाहेब कळसकर आणि अमोल अरविंद काळे या तिघांना मंगळवारी अटी व शर्तींसह जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुनावणी झाली. या गुन्ह्यातील अन्य सात संशयित आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाला असून, दोन संशयित फरार आहेत.

गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यात त्यांचा २० फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला हाेता. आवश्यक पुरावे उपलब्ध असूनही आरोपींना जामीन मंजूर होणे हे पानसरे कुटुंबीयांसाठी फारच दु:खद आहे. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी आम्ही वकिलांशी चर्चा करीत आहोत, असे गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी सांगितले.