राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात संजय राऊतांनी राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचे म्हटल्यानंतर या चर्चेला आणखी हवा मिळाली. पहिल्यांदाच राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून, मनसेच्या 'इंजिना'ची दिशा ठरल्याचे बोलले जात आहे. या भेटीपूर्वी राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या जवळीकविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या या भेटीने नवीन राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यावेळी उद्धव ठाकरे मविआ सोडणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता राज ठाकरेचं महाविकास आघाडीसोबत येण्याच्या दिशेने पावले पडत असल्याचे दिसत आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीने महाविकास आघाडीत आणखी एक पक्ष येणार असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत निवडणूक आयुक्तांना भेटायला जाण्यासंदर्भात प्रश्न विचारला.
जनतेला चांगले माहिती आहे
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोण कोणाला भेटत आहे, कोण कोणासोबत जाणार आहे, या गोष्टी आमच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या ठरत नाही. महाराष्ट्रासाठी कोण काम करतोय, कोण या राज्याचे नेतृत्व करू शकतो, हे जनतेला चांगले माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज्यातील जनता महायुतीला विजयी करणार आहे. संपूर्ण राज्य आमच्या पाठीमागे असून पुन्हा एकदा महापालिका आणि जिल्हा परिषदांवर भगवा फडकणार आहे. विधानसभेप्रमाणेच या निवडणुकीतही भाजप आणि मित्र पक्षांना यश मिळणार आहे. त्यामुळे कोणाच्या भेटीचा किंवा कुठे जाण्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.