गौतमी पाटील ढसाढसा रडली; अपघात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलली; रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…

गौतमी पाटील ढसाढसा रडली; अपघात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलली; रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…

 



इंदापूर : अपघात झालेली कार माझी आहे पम मी त्या कारमध्ये नव्हते. मी या प्रकरणात दोषी नाही. माझी कार चालकाकडे होती. माझ्यावर नाही त्या गोष्टींचा आरोप लावले जात आहेत, असं स्पष्टीकरण गौतमी पाटीलने दिले आहे. यावेळी गौतमीला अश्रू अनावर झाले होते. मंगळवारी इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात गौतमीचा कार्यक्रम झाला, यावेळी पहिल्यांदा तिने अपघाताच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी गौतमीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या "गौतमीला उचलायचं की नाही?" या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाली गौतमी पाटील?

गेल्या आठवड्यात वडगाव बुद्रुक येथे एक अपघात झाला होता. एका रिक्षाला गाडीने धडक दिली होती. अपघातात रिक्षा चालक विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघातग्रस्त वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने पुणे पोलिसांनी तिला नोटीस बजावली होती. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार होती. मंगळवारी पोलिसांनी अपघाताच्या वेळी त्या गाडीत गौतमी नसल्याचे स्पष्ट करत तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे सांगितले. यानंतर माध्यमांशी बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, मी त्यामध्ये दोष नाही. पोलिसांना देखील हे सांगितलं आहे, कार माझी होती पण मी कार मध्ये नव्हते. मला सर्व लोक ट्रोल करत आहेत. कोण काय म्हणते याकडे मी लक्ष देत नाही. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. मी त्या गाडीत नव्हते, तरीही मला दोषी ठरवलं जात होतं, असंही गौतमीने सांगितलं.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर काय म्हणाली गौतमी?

"चंद्रकांत पाटलांना जे वाटलं ते बोललेत. तो ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणाला काय बोलायचं त्यांना वाटलं त्यांनी तसं उत्तर दिलं. माझं म्हणणं एवढंच आहे जेव्हा अपघात झाला तेव्हा मी गाडीत नव्हते मी तिथे उपस्थित नव्हते. पीडित कुटुंबाला माझे मानलेले भाऊ आहेत त्यांच्याकडून मदत पाठवली होती. पण त्यांनी मदत नाकारली आणि कायदेशीर मार्गाने जाऊ असं सांगितलं. पण माझ्यावरच सगळे आरोप करायला बसले आहेत. प्रत्येक वेळी मीच ट्रोल होत असते सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी ट्रोलमध्येच आहे. जो तो येतो बोलून जातो, जे असेल ते आता न्यायाने सर्व व्यवस्थित होईल," असे ती म्हणाली.