खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

 

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांना भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार राऊत यांनी काही दिवसांपूर्वी याच फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्या रक्त तपासण्या करून घेतल्या होत्या. प्रकृती बिघडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आहे. राऊत यांच्या तब्येतीबद्दल सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही. खासदार संजय राऊत यांना यापूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला आहे आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टी (Angioplasty) शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी दोन अँजिओप्लास्टी...

पहिली अँजिओप्लास्टी: राऊत यांच्यावर नोव्हेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना छातीत हलका त्रास जाणवत होता. ही शस्त्रक्रिया लीलावती रुग्णालयात  झाली होती आणि त्यांच्या हृदयात दोन 'स्टेंट्स' बसवण्यात आले होते.

दुसरी अँजिओप्लास्टी: त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामध्ये आणखी 'स्टेंट्स' बसवण्यात आले होते, कारण आधी बसवलेल्या स्टेंट्सपैकी एकामध्ये पुन्हा ब्लॉकेज आढळला होता. ही शस्त्रक्रियासुद्धा लीलावती रुग्णालयात करण्यात आली होती.