
१० टक्के कमिशनमुळे गेले १५ चिमुकल्यांचे जीव; ‘कोल्ड्रिफ’साठी डॉक्टरनं घेतले होते पैसे, पोलिसांचा कोर्टात दावा!
गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरप प्रकरणात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या कफ सिरपमधील काही घटकांमुळे ते लहानग्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरल्यानंतर त्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. बंदी असलेल्या घटकांचं अस्तित्व असूनही हे कफ सिरप मुलांच्या उपचारांसाठी कसं दिलं गेलं? असा सवाल उपस्थित केला जात असून त्यावर आता पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक दावा केला आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. प्रवीण सोनी यांनी हे कफ सिरप रुग्णांना देण्यासाठी संबंधित कंपनीकडून १० टक्के कमिशन घेतलं होतं, असा दावा पोलीस विभागाकडून करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात डॉ. प्रवीण सोनी यांनी कोल्ड्रिफ कफ सिरप उपचारांसाठी लिहून दिलेल्या १५ मुलांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर डॉ. प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली असून या सिरपचं उत्पादन करणाऱ्या श्रीसेन फार्मास्युटिकलला टाळं ठोकलं आहे. तसेच, तामिळनाडू सरकारने कंपनी बंद करण्याचे आदेश जारी केले असून ईडीनं श्रीसेन कंपनीशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरू केली आहे.
औषध लिहून देण्यासाठी डॉक्टरनं कंपनीकडून घेतलं कमिशन!
या प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. प्रवीण सोनी यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी सत्र न्यायालयात पार पडली. यावेळी पोलिसांच्या वतीने कमिशनचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. श्रीसेन कंपनीकडून डॉ. प्रवीण सोनी यांनी कोल्ड्रिफ कफ सिरप रुग्णांना लिहून देण्यासाठी १० टक्के कमिशन घेतल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे. यावेळी पोलीस दलाने केलेल्या तपासाच्या अहवालातील नोंदी न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या.
पोलीस तपासातील धक्कादायक माहिती
न्यायालयात सादर अहवालानुसार, १८ डिसेंबर रोजी डिरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसने सर्व राज्यांसाठी यासंदर्भात मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये चार वर्षांच्या खालील मुलांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन अर्थात FDC दिलं जाऊ नये, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. अस असूनदेखील, डॉ. सोनी यांनी कोल्ड्रिफ सिरपसोबतच अशा प्रकारची औषधं मुलांना उपचारांसाठी लिहून दिली. विशेष म्हणजे, या औषधांमुळे मुलांना लघवीस न होणे आणि किडनी खराब होणे अशा व्याधी होत असल्याचं माहिती असूनही सोनी यांनी ही औषधं मुलांना दिली. शिवाय, आत्तापर्यंत डॉ. सोनी यांच्या औषधांमुळे १५ मुले दगावली असून कोल्ड्रिफ औषध देण्यासाठी त्यांना श्रीसेन कंपनीकडून १० टक्के कमिशनदेखील मिळालं होतं.
डॉ. प्रवीण सोनी यांची भूमिका काय?
डॉ. सोनी यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप न्यायालयासमोर फेटाळून लावले आहेत. “डॉ. सोनी हे एक सरकारी डॉक्टर असून ते उपचारांदरम्यान क्वचितच रुग्णाला औषधं लिहून देतात. हानीकारक घटक असलेल्या औषधाचं उत्पादन संबंधित कंपनीनं केलं होतं, त्याबद्दल डॉ. प्रवीण सोनी यांना काहीच कल्पना नव्हती. ते गेली ३५ ते ४० वर्षं वैद्यकीय सेवा करत आहेत. त्यामुळे त्यांनी जाणून-बुजून हे औषध लिहून दिलेलं नाही. औषधाच्या गुणवत्तेची जबाबदारी औषध प्रशासन विभागाची असते”, असा युक्तिवाद सोनी यांच्या वकिलाने केला आहे.
जीवघेण्या कोल्ड्रिफमधून नातलगांचाही फायदा!
दरम्यान, डॉ. सोनी यांनी कोल्ड्रिफ औषधाच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांचाही फायदा करून दिला का? यासंदर्भात आता पोलीस तपास करत आहेत. सोनी यांच्या खासगी क्लिनिकला लागून असलेलं मेडिकल हे त्यांच्या नातेवाईकांच्याच मालकीचं असल्याचं समोर आलं आहे. शिवाय, हानीकारक अशा कोल्ड्रिफ कफ सिरपचा साठा करून ठेवलेला डीलरदेखील त्यांच्या कुटुंबाचाच भाग असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं आहे.
दरम्यान, श्रीसेन कंपनीचे संचालक रंगनाथन यांना पुढील चौकशीसाठी मध्य प्रदेशमधून तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. रंगनाथन, डॉ. सोनी आणि जबलपूरमधील एका औषध विक्रेत्याविरोधात या प्रकरणात ४ ऑक्टोबर रोजीच मध्य प्रदेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साध्या सर्दी, ताप, खोकल्याची होती तक्रार!
छिंदवाडातील परासिया भागामध्ये डॉ. सोनी यांची शासकीय आरोग्य केंद्रावर नियुक्ती आहे. या भागात ५ वर्षांखालील अनेक मुलांना साध्या सर्दी, खोकला आणि तापावर डॉ. सोनी यांनी कोल्ड्रिफ औषध लिहून दिलं. हे कफ सिरप घेतल्यानंतर काही मुलांना लघवी करण्यास त्रास जाणवू लागला. शिवाय काहींना किडनीचाही त्रास सुरू झाल्याचं निदर्शनास आलं. त्यांना तिथून नागपूरला उपचारांसाठी पाठवण्यात आलं. मात्र, तिथे त्यांचा मृत्यू झाला.