
भाजपा आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन
भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मंत्री तथा राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट करून या निधनाची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राहुरीच्या आमदारकीसह त्यांच्याकडे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपदही होतं. आज पहाटे त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते.
शिवाजीराव कर्डीले यांना आज पहाटे त्रास जाणवू लागला. त्यांना अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यातआलं. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रद्धांजली अर्पण केली
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डीले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदार संघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार कर्डीले यांच्या निधनाने कर्डीले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
अजित पवारांनी श्रद्धांजली अर्पण केली
“राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हणाले की, “आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार, राज्यमंत्री तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचं व्रत जोपासले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांकडून श्रद्धांजली
कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण करत रोहित पवार म्हणाले, शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्व श्रद्धांजली!
शिवाजीराव कर्डीलेंची राजकीय कारकिर्दी
शिवाजीराव कर्डीले हे भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना हॅटट्रिक करता आली नाही. त्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्राजक्त तनपुरे यांनी कर्डीले यांचा पराभव केला होता. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत कर्डीले यांनी जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल ३४ हजार मतांनी पराभव करत पुन्हा एकदा विधानसभा गाठली होती.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कर्डीले यांना १,३५,८५९ मतं मिळाली होती. तर, तनपुरे यांना १,०१,३७२ मतं मिळाली होती. शिवाजीराव कर्डीले हे मूळचे आहिल्यानगर जिल्ह्यातील बुऱ्हानगर गावचे रहिवासी आहेत. येथूनच त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.