बारामती, नीरा परिसरात घरफोडी करणाऱ्या चार आरोपीना अटक

बारामती, नीरा परिसरात घरफोडी करणाऱ्या चार आरोपीना अटक

 

बारामती- भिगवण रस्त्यावरील वंजारवाडी येथील जगदंबा हॉटेलमध्ये झालेल्या चोरी आणि घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपींना भोर आणि इंदापूर येथून अटक केली असून त्यांनी बारामतीसह नीरा परिसरात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती पुढे येत आहे.

दि.१६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून दि. १७ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी वंजारवाडी येथील हॉटेल जगदंबाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करून ३२ हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी विजय मोहिते यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला.

गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, अनिल सुनिल निकम आणि गणेश मधु निकम (दोघे रा. वडगाव डाळ, ता. भोर, जि. पुणे) यांनी त्यांच्या साथीदारांसह ही चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी भोर येथे धाड टाकून या दोघांना अटक केली. चौकशीत आरोपींनी आपल्या साथीदारांची नावे रवी मंगेश जाधव आणि रवी बंडु थोरात (दोघे रा. म्हातोबानगर, मुळशी, सध्या रा. रूई, ता. इंदापूर) अशी सांगितली. पोलिसांनी रूई येथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. या आरोपींकडून चोरीस गेलेले विविध कंपन्यांचे एकूण ७ मोबाईल फोन आणि १,०५० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपासात आणखी मोबाईल हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल,  अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार दादासाहेब दराडे, सुरेंद्र वाघ, किशोर वीर, भारत खारतोडे, निलेश वाकळे आदींनी केली आहे.