माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी झाला आहे : मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस

माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी झाला आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

तालुक्याच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या, तब्बल ७० ते ७५ हजार नागरिकांच्या साक्षीने विराट सभा संपन्न  

मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा धडाका, विरोधकांच्या 'राजकारणावर' सडकून टीका; रणजितदादांच्या मागण्यांना 'ऑन द स्पॉट' मंजुरी

फलटण: “ज्या निरा-देवघरच्या पाण्याबद्दल हे अशक्य आहे, हे कधीच होणार नाही, असे सांगितले जात होते, ते आम्ही करून दाखवले आहे, अशक्य शक्य केले आहे. माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी झाला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटणच्या भूमीवरून विकासाची ग्वाही देत विरोधकांना ठणकावले. फलटण तालुक्याच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या, तब्बल ७० ते ७५ हजार नागरिकांच्या साक्षीने यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पटांगणावर झालेल्या विराट सभेत ते बोलत होते.

फलटण येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा भव्य ई-भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांनी सुमारे ९६७ कोटी रुपये खर्चाच्या निरा-देवघर सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासह शेकडो कोटींच्या कामांचा शुभारंभ केला.

या अभूतपूर्व कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल, आमदार महेश शिंदे, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार राम सातपुते यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, मान्यवर आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रास्ताविक करून आज होणाऱ्या विकासकामांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने निरा-देवघर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा समावेश असून, यामुळे फलटण, खंडाळा, माळशिरस या पर्जन्यछायेतील तालुक्यांमधील सुमारे १२,९७० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यासोबतच, नूतन प्रशासकीय इमारत, महसूल भवन, फलटण शहर, फलटण ग्रामीण व वाठार येथील सुसज्ज पोलीस ठाण्यांचे लोकार्पण, पालखी मार्गाचे काम आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

‘प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे राजकारण’ सहन करणार नाही : मुख्यमंत्री

भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथील तरुण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूवर शोक व्यक्त केला. “त्या भगिनीने हातावर लिहून ठेवलेल्या कारणानुसार आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. तिला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

मात्र, याच घटनेवरून विरोधकांनी सुरू केलेल्या राजकारणाचा त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. “या प्रकरणात काहीही कारण नसताना रणजितदादा आणि सचिनदादांचे नाव गोवण्याचा अतिशय निंदनीय प्रयत्न झाला. महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. जर यात तिळमात्रही शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द करून आलो नसतो. अशा बाबतीत मी पक्ष, व्यक्ती किंवा राजकारण पाहत नाही. पण, अशा प्रकारे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे राजकारण कोणी करत असेल, तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही, त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे,” अशा परखड शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

णजितदादांच्या सर्व मागण्यांना तत्काळ मंजुरी; घोषणांचा पाऊस

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे ११ नव्या मागण्यांचे निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर तत्काळ निर्णय घेत घोषणांचा पाऊस पाडला:

पाडेगाव-शिंगणापूर रस्ता: “बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे हे फलटणचे जावई आहेत. त्यांच्या वतीने मीच आश्वासन देतो की, एमएसआयडीसीमार्फत हा रस्ता आपण पूर्ण करू,” अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी रस्त्याला मंजुरी दिली.

नाईकबोमवाडी MIDC: “येथील एमआयडीसीसाठी एका मोठ्या मेगा प्रोजेक्टकरिता मी पाठपुरावा करत आहे. काही लोकांशी बोलणी सुरू आहेत, मी तो प्रोजेक्ट तुम्हाला निश्चितपणे देणार.”

फलटण एअरपोर्ट: “मी आजच आश्वासन देऊ शकत नाही, पण या एअरपोर्टच्या सर्वेक्षणासाठी मी एक पीएमसी नियुक्त करीन. जर अहवाल व्यवहार्य (feasible) आला, तर ते काम मी निश्चितपणे करून देईन.”

उपसा सिंचन योजना: निरा-देवघर प्रकल्पातील गावडेवाडी, शेखमीरवाडी आणि वाघोशी या उपसा सिंचन योजनांनाही तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश त्यांनी जलसंपदा सचिवांना दिले.

शासकीय रुग्णालय: फलटणमध्ये सुसज्ज शासकीय रुग्णालयासाठी सध्याच्या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन (upgradation) करून नवी इमारत व यंत्रसामुग्री देण्याचा निर्णय सरकार घेईल.

‘सेटिंग’चा टोला: अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडी तहसील कार्यालय या मागण्यांबाबत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. “या छोट्या कामांसाठी माझ्याकडे यायची गरज नाही. तुमचे बावनकुळे साहेबांकडे चांगले ‘सेटिंग’ आहे, मला त्रास देण्याची आवश्यकता नाही,” असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही; शेतकऱ्यांना ५ वर्षे वीज बिल माफ

राज्यातील लोकप्रिय योजनांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “जोपर्यंत देवाभाऊ, शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत, तोपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजना कधीच बंद होणार नाही. आमच्या बहिणींना भाऊबीज मिळत राहील.” याचबरोबर, “आमच्या शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे कुठलेही वीज बिल भरावे लागणार नाही. पाच वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करा, म्हणजे आम्ही पुढची पाच वर्षे ती सवलत देऊ,” असे सांगत त्यांनी २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत सौर वीज देण्याचेही जाहीर केले.

मुख्यमंत्री ‘आधुनिक भगीरथ’, पण फलटणमध्ये एक ‘शकुनी मामा’ : जयकुमार गोरे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांचा ‘आधुनिक भगीरथ’ असा गौरव केला. “लोकसभेच्या पराभवानंतरही रणजितदादा खचून न बसता, तिसऱ्या दिवशी कामाला लागले. त्यांच्या नेतृत्वाखाली सचिनदादांनी अशक्य विजय मिळवला आणि खऱ्या अर्थाने फलटण ‘स्वतंत्र’ झाले,” असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी नाव न घेता विरोधकांवर हल्ला चढवला. “महाभारत असो वा रामायण, प्रत्येक युद्धाला एक शकुनी मामा कारणीभूत असतो. असाच एक शकुनी मामा फलटणमध्येही आहे, जो केवळ षडयंत्र करण्याचेच काम करतो,” असा जोरदार टोला त्यांनी लगावला.

‘बदला’ नव्हे, तालुका ‘बदलायचा’ आहे : रणजितसिंह

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना फलटणच्या जनतेच्या ७० वर्षांच्या पाणी संघर्षाला मुख्यमंत्र्यांनीच न्याय दिल्याचे सांगितले. “मुख्यमंत्री आमच्यासाठी ‘देवमाणूस’ आहेत. निरा-देवघरचे काम पूर्णत्वास जात असल्याचे पाहून ते भावूक झाले होते. “माझा बदला घेण्यावर विश्वास नाही, तर मला माझा तालुका ‘बदलायचा’ आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त २० हजार सायकली आणि दिवाळीनिमित्त ३० हजार किराणा किट वाटल्याचाही उल्लेख केला.

उत्तर कोरेगावच्या २६ गावांना पाणी द्या : आमदार सचिन पाटील

आमदार सचिन पाटील यांनी आपल्या भाषणात त्यांचे राजकीय गुरू दिवंगत हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या पाणी संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. “रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीच माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार बनवले,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, वसना प्रकल्पातील मंजूर अतिरिक्त ०.५२ टीएमसी पाण्यामधून उत्तर कोरेगाव भागातील कायम दुष्काळी असलेल्या २६ गावांना पाणी मिळावे, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मानपत्र आणि लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांनी मानले.