इंदापूर बसस्थानकावर मध्यरात्री एसटीला आग; सुदैवानं प्रवासी बचावले
रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५
Edit
इंधन गळतीमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज; क्षणात बस जळून खाक, ५० प्रवासी सुखरूप
इंदापूर : इंदापूर बसस्थानकावर शनिवारी (दि. २५) मध्यरात्रीच्या सुमाराला उभ्या राहिलेल्या एसटीला अचानक आग लागली आणि काही समजायच्या आत या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झाली आहे. या एसटीमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. सुदैवानं कोणालाही इजा झाली नसली तरी या प्रवाशांचं साहित्य मात्र जळून राख झालं आहे.
पुण्याहून धाराशिवकडे निघालेली एसटी बस (एमएच २० बीएल ४२३३) ही मध्यरात्री २.१० वाजता इंदापूर बसस्थानकाच्या फलाट क्रमांक ११ वर आली. याच वेळी इंधन गळतीमुळे या बसला अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
ज्यावेळी आग लागली त्यावेळी बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. तात्काळ अग्निशामक बोलावून ही आग आटोक्यात आणली; मात्र या आगीत बस पूर्ण खाक झाली.