आयएनएस विक्रांतच्या च्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली होती”, नौदलाबरोबर दिवाळी साजरी करताना पंतप्रधान मोदींचे भाष्य

आयएनएस विक्रांतच्या च्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली होती”, नौदलाबरोबर दिवाळी साजरी करताना पंतप्रधान मोदींचे भाष्य

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएनएस विक्रांतवरील नौदल जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या वाढत्या ताकदीचा आणि पाकिस्तानवरील हल्ल्याचा उल्लेख केला आहे. याशिवाय, पंतप्रधानांनी नक्षलवादावरही भाष्य केले आणि लवकरच तो मुळापासून नष्ट होईल, असा दावा केला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आजचा दिवस आणि हा क्षण संस्मरणीय आहे. आज माझ्या एका बाजूला विशाल समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या शूर जवानांची अफाट शक्ती आहे. एका बाजूला अनंत आकाश आहे, तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तींचे मूर्त रूप देणारे हे विशाल, महाकाय आयएनएस विक्रांत आहे.”

पंतप्रधान पुढे म्हणाले की, “ही प्रचंड जहाजे, वाऱ्यापेक्षा वेगाने उडणारी विमाने आणि पाणबुड्या यांना तुमच्यात असलेली आवड जिवंत करते. ही जहाजे लोखंडाची बनलेली असू शकतात, पण जेव्हा तुम्ही त्यावर चढता, तेव्हा ती शूर, जिवंत जवान बनतात.”

पाकिस्तानचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी आपण पाहिले की आयएनएस विक्रांतच्या नावानेच संपूर्ण पाकिस्तानची झोप उडाली होती. आयएनएस विक्रांत हे असे जहाज आहे, ज्याच्या नावानेच शत्रू मोडून पडतो. भारतीय नौदलाने निर्माण केलेला दरारा, भारतीय हवाई दलाने दाखवलेले अविश्वसनीय कौशल्य आणि भारतीय लष्कराचे शौर्य यामुळे पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरदरम्यान आत्मसमर्पण करावे लागले.”

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विक्रांतबद्दल बरेच भाष्य केले. ते म्हणाले की, विक्रांत हे विशाल आणि भव्य जहाज आहे. विक्रांत अद्वितीय आणि खास आहे. विक्रांत केवळ एक युद्धनौका नाही, ती २१व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, सरासरी दर ४० दिवसांनी एक नवीन स्वदेशी युद्धनौका किंवा पाणबुडी नौदलात समाविष्ट केली जात आहे. ब्रह्मोस आणि आकाश सारख्या आपल्या क्षेपणास्त्रांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील त्यांची क्षमता सिद्ध केली आहे.

दिवाळीबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावीशी वाटते. मलाही माझ्या कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळी साजरी करण्याची सवय झाली आहे. म्हणूनच मी तुम्हा सर्व कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळी साजरी करायला येतो.”