देशावर संकट आल्यावर मदतीसाठी ‘मोठे’ लोक माझे नाव घेतात… शरद पवार असे का म्हणाले?

देशावर संकट आल्यावर मदतीसाठी ‘मोठे’ लोक माझे नाव घेतात… शरद पवार असे का म्हणाले?

 

काम द्यायचे असेल, तर बारामतीच्या तरुणांना द्यावे, असा संदेश देशात गेला पाहिजे,’ असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बारामती: देशावर संकट आले की, काही ‘मोठे’ लोक मदतीसाठी शरद पवारांचे नाव घेतात, ही बारामतीची ताकद आहे. त्यामुळे तरुणांनी कष्ट करण्याची तयारी ठेवा. काम द्यायचे असेल, तर बारामतीच्या तरुणांना द्यावे, असा संदेश देशात गेला पाहिजे,’ असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

पवार हे गेल्या चार दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील ‘बारामती हायड्रोलिक’ कंपनीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘तरुणांनी चिकाटी सोडता कामा नये. कष्ट करायची ताकद ठेवली पाहिजे. कोणतेही संकट आले, तरी चिंता करू नये. देशावर संकट आले की. काही मोठे लोक शरद पवार यांचे नाव घेतात. त्यांचे नाव आता घेत नाही. त्यामुळे कोणतेही संकट आले, तर त्याची सोडवणूक करण्यात येईल. मात्र, तरुणांनी काम व्यवस्थित केले पाहिजे. काम द्यायचे असेल, तर ते बारामतीतील तरुणांना दिले पाहिजे, असा संदेश देशात गेला पाहिजे.’

‘बारामतीतून पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेल्यावर काम करण्याची संधी मिळाल्यावर बारामतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) सुरू करण्याचा निर्णय घेतला, दुधावर प्रक्रिया करण्यासाठी डायनामिक्स कंपनी आणण्याचे ठरविण्यात आले. तेव्हा स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिकांनी जमीन देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर बारामती ही उद्योगाचे केंद्र झाले. त्यांनतर शैक्षणिक सुविधा करण्यात आल्या. तेथून शिकलेली मुले ही देशात विविध भागांमध्ये काम करताना दिसून येतात.’ असेही पवार म्हणाले.

दरम्यान, बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे पवार यांनी अनेक वर्षांनंतर भेट दिली. ग्रामस्थांनी रोजगाराबाबतच्या समस्या मांडल्या. ‘स्थानिक युवकांना एमआयडीसीत अनेक कंपन्यांमध्ये स्थान दिले जात नाही. स्थानिक असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो. त्यांना डावलले जाते,’ अशी तक्रार वंजारवाडीचे सरपंच जगन्नाथ वनवे यांनी केली. त्यावर या समस्या सोडवण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.