
वेळप्रसंगी किंमत मोजू; मात्र संस्थेचा नावलौकिक परत मिळवू : अजित पवार
माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्था अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी विश्वस्त खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अजित पवार यांनी संस्थेच्या अनागोंदी कारभाराचे आपल्या शैलीत वाभाडे काढले. संस्थेवर असलेले १४ कोटी रुपये कर्ज, वशिल्याने केलेली खोगीर भरती, आर्थिक गैरव्यवहार, सभासदांनी थकवलेली फी, विद्यार्थी गुणवत्ता, मेस, पीएफ न भरणे याबाबतीत परखड मत व्यक्त केले. तसेच कर्मचारी मूल्यमापन करून खोगीरभरती केलेल्या कामगारांना काढून टाकणे, सुरक्षा एजन्सी संस्थेमार्फत चालवणे, चांगल्या ऑडिटरची नेमणूक करणे, संस्थेच्या उत्कर्षासाठी विविध उपाययोजना याबाबत धोरण राबविण्याबाबत चर्चा केली. यावेळी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप, विरोधी संचालक चंद्रराव तावरे, रामदास आटोळे, नितीन सातव, शिवराजराज राजे जाधवराव, स्वप्निल जगताप, विलास देवकाते यांनी विविध समस्या अध्यक्ष खासदार पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, विश्वस्त राजेंद्र काटे, धन्यकुमार जगताप, विराज खलाटे , प्रवीण पोंदकुले, रोहन देवकाते, डॉ. मोहन नेवसे, गणपतराव देवकाते, आशा जराड व नीलेश नलावडे यांचा अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सत्कार केला.