बारामती नगरपालिका तसेच माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अजित पवार गुरुवारी घेणार उमेदवारांच्या मुलाखती
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार हे गुरुवारी बारामती नगरपालिका तसेच माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. या मुलाखतीनंतर ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मार्गदर्शनही करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बारामती आणि परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या निवडीसाठी पक्ष पातळीवर हालचालींना वेग आला आहे. अजित पवार स्वतः उमेदवारांची पार्श्वभूमी, स्थानिक कार्यकर्त्यांतील लोकप्रियता आणि मतदारसंघातील कामगिरी पाहून निर्णय घेतील अशी शक्यता आहे.
माळेगाव नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर या भागात विकासकामांना मोठा वेग आला असल्याचेही त्यांनी नमूद केले. रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय सूत्रांनुसार,अजित पवार यांनी मुलाखती घेऊन अंतिम उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर बारामती आणि माळेगाव या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीच्या रणनीतीला अंतिम स्वरूप मिळेल. स्थानिक पातळीवरील गटबाजी कमी करून एकसंघ पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन ते कार्यकर्त्यांना करण्याची शक्यता आहे.