धनंजय मुंडेंनी कट रचला.... मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या हत्येचा कट उघड केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या कटामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते हत्येचा कट रचत असल्याची माहिती जरांगे यांनी दिली.
त्याचबरोबर धनंजय मुंडे हे खूप पोहचलेला व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे पंकजा मुंडेंपासून धसांपर्यंत अनेक जाणांच्या अनेक गोष्टी आहेत असा दावा देखील जरांगे पाटील यांनी केला. पत्रकार परिषदेच्या शेवटी त्यांनी धनंजय मुंडे हे आमच्याच बांधवाच्या माध्यमातून आमच्या मुळावर उठले असं देखील म्हणाले. जरांगे पाटील ही धक्कादायक माहिती आम्हाला मिळालेली आहे. आता तपासात काय पुढं येतं ते पाहू असं देखील म्हणाले.
शांततेचे आवाहन
जरांगे पाटील यांनी भाषणाची सुरुवात करताना मराठा समाजातील सर्व बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले. "साधी कामं समाजाने करायची आहेत. अवघड कामं करायला मी आहे. मी असेपर्यंत कोणीही टेन्शन घ्यायचं नाही," असे ते म्हणाले.
ते म्हणाले, "मी समाजाला शब्द देतो, मी जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत टेन्शन नाही. मी मेल्यावर काही करायचं ते करा. मी असेपर्यंत शांत राहायचंय." त्यांनी या घटनेमुळे 'आपले हात खूप लांब आहेत हे आता त्यांच्या लक्षात आले असेल' असे सांगत विरोधकांना इशारा दिला.
असा कट रचण्याचा प्रयत्न
जरांगे यांनी या कटाचा घटनाक्रम सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
सुरुवातीचा कट: आरोपींनी प्रथम जरांगे यांचे खोटे रेकॉर्डींग आणि खोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने त्यांनी पुढचा मार्ग स्वीकारला.
हत्येचे नियोजन: दुसऱ्या टप्प्यात खूनच करून टाकायचा असे ठरले, तर तिसऱ्या टप्प्यात गोळ्या देऊन किंवा औषध देऊन घातपात करायचे ठरले.
बीड कनेक्शन: जरांगे यांनी सांगितले की, बीड येथील एक कार्यकर्ता/पीए दोनपैकी एका आरोपीकडे गेला आणि त्यांना सोबत घेतले.
धनंजय मुंडेंवर थेट आरोप: जरांगे पाटील यांनी बीडमधील कांचन नावाचा एक माणूस धनंजय मुंडेचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख केला. त्यांनी स्पष्टपणे आरोप केला की, "धनंजय मुंडे यांनी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्याचं काम केलं." आरोपींना परळी येथे नेण्यात आले आणि रेस्ट हाऊसवर झालेली मोठी बैठक धनंजय मुंडेंनी सोडली, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठा नेत्यांना इशारा
जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा समाजातील सर्व राजकीय नेत्यांना हा विषय गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले.
"जेवढे मराठा नेते आहेत, त्यांनी हा विषय सिरिअस घ्या. सर्वांनी हा विषय गंभीरपणे घ्या. आज माझ्यावर बेतलंय, उद्या तुमच्यावरही बेतू शकतो. असल्या वृत्तीचा नायनाट करावाच लागणार आहे."
तपास पूर्ण होऊन प्रशासनाकडून नावं स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण अधिक नावं घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. "तुम्ही शांत राहिलात, तर सुखाचा दिवस मला आणता येईल," असे सांगत त्यांनी मराठा समाजाला विश्वासात घेतले.