गुरुवारी होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायत निवडणुकी साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
बारामती: बारामती नगरपरिषदेसह माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. बारामती येथील राष्ट्रवादी भवनात या मुलाखती होणार असून नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
बारामती नगरपरिषदेची तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. बारामती नगरपरिषदेत एकूण ४१ जागा असून नगराध्यक्षांची निवडही जनतेमधून होणार आहे. तर माळेगाव नगरपंचायतीच्या १७ जागा आणि नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडे अनेकांनी उमेदवारीसाठी अर्ज दिले आहेत. त्यातून नगराध्यक्ष व नगरसेवकपदांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवार निश्चित करणार आहेत.
गुरुवारी दिवसभर अजितदादा राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. सकाळी बारामती नगरपरिषदेचे इच्छुक आणि दुपारनंतर माळेगाव नगरपंचायतीतील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. त्यामध्ये इच्छुकांच्या संकल्पना, जनसेवेप्रती असलेली भावना, कामाची पद्धत, लोकांमधील प्रतिमा आदी बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच उमेदवारी निश्चित करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं गुरुवारचा दिवस इच्छुकांसाठी महत्वाचा असणार आहे.
दरम्यान, मुलाखतीदरम्यान अनेकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली असून अजितदादांसमोर आपलंच पारडं जड कसं दाखवता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.