"षडयंत्र रचणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही"; दिल्लीतील स्फोटानंतर पंतप्रधान मोदी गरजले
दिल्ली: राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या स्फोटात १० हून अधिक लोक मारले गेले. दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ल्याजवळील गजबजलेल्या परिसरात हा स्फोट घडवण्यात आला. या स्फोटामागे जैश ए मोहम्मद कनेक्शन आता समोर येत आहे. त्यातच पंतप्रधान २ दिवसीय भूतान दौऱ्यावर गेले आहेत. ११ आणि १२ नोव्हेंबरला हा दौरा होणार असून त्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र दिल्लीतील स्फोटावरून भूतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच गरजले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दिल्लीतील या घटनेने सर्वांचे मन व्यथित आहे. मी पीडित कुटुंबाचे दु:ख जाणतो, आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे. दिल्ली स्फोटातील दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. या घटनेनंतर मी रात्रभर या घटनेशी जोडलेल्या अधिकाऱ्यांसोबत, यंत्रणेसोबत संपर्कात होतो. घटनेशी निगडित सर्व धागेदोरे जोडले जात आहे. आमच्या तपास यंत्रणा या घटनेच्या मुळाशी जातील. या घटनेमागील षडयंत्रकाऱ्यांना सोडले जाणार नाही असं त्यांनी इशारा दिला.
भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीचे संबंध आणि भागीदारी मजबूत करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा २ दिवसीय दौरा आहे. मागील ११ वर्षात पंतप्रधान मोदी चौथ्यांदा भूतान दौरा करत आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. यावेळी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या सोहळ्यात ते उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी भूतानला १ हजार कोटी आर्थिक सहाय्य देणार आहेत. त्याशिवाय ते ग्लोबल पीस प्रेयर फेस्टिवलमध्येही सहभागी होतील.
भारतासाठी भूतान का महत्त्वाचे?
हिमालयीन राष्ट्र भूतान हे भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. केवळ ७,५०,००० लोकसंख्या असलेला हा एक लहान देश असला तरी तो भारत आणि चीनमधील बफर झोन म्हणून काम करतो. भूतानमध्ये चीनचा प्रभाव वाढल्याने भारताच्या चिकन नेकला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भारत भूतानला सुरक्षा कवच मानतो. २०१७ मध्ये चीनने भूतानच्या डोकलाम प्रदेशात रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या लष्कराने तो रोखला. शिवाय भूतान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळविण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो.