बारामती नगरपरिषद निवडणुक - प्रभाग क्र. २ मधील राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराची झाली बिनविरोध निवड
बारामती: बारामती नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीदिवशीच राष्ट्रवादीनं खातं खोललं आहे. प्रभाग क्र. २ मधून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार अनुप्रिता रामलिंग तांबे-डांगे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळं या जागेसाठी एकमेव अर्ज राहिल्यामुळं अनुप्रिता डांगे यांची निवड बिनविरोध मानली जात आहे.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्याउमेदवारी अर्जांची छाननी आज पार पडली. यामध्ये प्रभाग २ मधून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अनुप्रिता डांगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात एकमेव अर्ज दाखल होता. मात्र या अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केलेलं नसल्यामुळे हा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यामुळं डांगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ४२ जागांसाठी ४२ अर्ज, भाजपकडून ३० आणि शरद पवार गट आणि महाविकास आघाडीने एकत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध भाजप आणि महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे.