रंजन तावरेंची अजितदादांसोबत हातमिळवणी; माळेगाव कारखाना निवडणुकीत विरोधात, आता नगरपंचायतीला एकत्र

रंजन तावरेंची अजितदादांसोबत हातमिळवणी; माळेगाव कारखाना निवडणुकीत विरोधात, आता नगरपंचायतीला एकत्र

 

माळेगाव: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या पॅनलविरोधात लढलेल्या रंजन तावरे यांनी माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली असून राष्ट्रवादीला बारा आणि रंजन तावरे गटाला सहा जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळं माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक एकतर्फीच होण्याची शक्यता आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: चेअरमनपद घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी ब वर्गातून स्वत:ची उमेदवारी ठेवत ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर माळेगाव नगरपंचायत निवडणुकीतही पुन्हा राष्ट्रवादी आणि रंजन तावरे गट समोरासमोर येणार अशा चर्चा होत्या.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र माळेगाव नगरपंचायत निवडणुकीचं चित्र बदलल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रंजन तावरे यांच्यात दिलजमाई होऊन १२-६ चा फॉर्म्युला ठरवण्यात आला. त्यानुसार नगराध्यक्षपद आणि अकरा नगरसेवकपदाच्या जागा राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. तर उर्वरीत सहा जागा रंजन तावरे यांच्या गटाला मिळाल्या आहेत. माळेगाव नागरपंचायतीत झालेल्या या युतीमुळे निवडणूक एकतर्फीच होईल अशी शक्यता आहे.

दरम्यान, अनपेक्षितपणे झालेल्या या युतीनंतर नाराज इच्छुकांसह शरद पवार गटाची भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागले आहे. शरद पवार गटाकडून अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरलेला नाही. त्यातच उमेदवार कोण याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळं आता या निवडणुकीत शरद पवार गटाचा पवित्रा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माळेगाव नगरपंचायत निवडणूक पक्षनिहाय उमेदवार : राष्ट्रवादी कॉँग्रेस : नगराध्यक्षपद : सुयोग सातपुते, प्रभाग क्र. ३ : संगिता जाधव, प्रभाग क्र. ५ : सोनाली रासकर, प्रभाग क्र. ७ : शितल खरात, प्रभाग क्र. ८ : वृषाली तावरे, प्रभाग क्र. ९ : अॅड. गायत्री तावरे, प्रभाग क्र. १० : भाग्यश्री कदम, प्रभाग क्र. १२ : शशिकांत तावरे, प्रभाग क्र. १३ : अविनाश तावरे, प्रभाग क्र. १५ : जयदीप दिलीप तावरे, प्रभाग क्र. १६ : प्रांजली येळे, प्रभाग क्र. १७ : साधना वाघमोडे

रंजन तावरे गट – प्रभाग क्र. १४ : प्रमोद तावरे, प्रभाग क्र. ११ : जयदीप विलास तावरे, प्रभाग क्र. १ : प्रतिभा सस्ते, प्रभाग क्र. ४ : लियाकत तांबोळी, प्रभाग क्र. ६ : जयपाल भोसले, प्रभाग क्र. २ :  गौरव भुंजे.