बारामतीचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांची बदली; श्रीशैल चिवडशेट्टी यांच्यावर बारामती शहर पोलिस ठाण्याची धुरा
बारामती- बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांची इंदापूरला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शहर पोलिस ठाण्याचा कार्यभार वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्याकडे देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील पाच पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
प्रशासकीय गरज म्हणून या बदल्या करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी कळवले आहे. बारामतीचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांना इंदापूर पोलिस ठाण्याचा कार्यभार देण्यात आला आहे. तर बारामती वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्यावर बारामती शहर पोलिस ठाण्याची धुरा सोपवण्यात आली आहे. इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोंकणे याची बदली सायबर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
बारामती वाहतूक शाखेचा कार्यभार जिल्ह्यात नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षक नीलेश माने यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांना जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती देण्यात आली आहे. प्रशासकीय निकड आणि जनहिताचा विचार करून या बदल्या करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षकांनी कळवले आहे.
पोलिस निरीक्षक नाळेंची वादग्रस्त कारकीर्द
दरम्यान, बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, अधिकाराचा गैरवापर करणे अशा अनेक तक्रारी नाळे यांच्याबाबत होत्या. नाळे यांच्या मनमानीमुळे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता.