बारामतीत नगरपरिषद निवडणूकीची लगबग सुरु....
निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर केल्यानंतर आता अवघ्या एका महिन्यात निवडणूकीची प्रक्रीया पार पडणार असल्याने इच्छुकांकडे तुलनेने वेळ कमी राहणार आहे. 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 17 नोव्हेंबरपर्यंत ही मुदत आहे.
21 नोव्हेंबर रोजी दुपारी बारामती नगरपरिषद निवडणूकीतील प्रभागनिहाय उमेदवारीचे तसेच बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अंतिम उमेदवार कोण असतील हेही अंतिम चित्र स्पष्ट होईल. मतदान 2 डिसेंबर रोजी होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन नगरपरिषद अस्तित्वात येईल.
बारामती नगरपरिषदेची या पूर्वीची निवडणूक 14 डिसेंबर 2016 रोजी झाली होती. तब्बल नऊ वर्षांच्या कालखंडानंतर ही निवडणूक होत असल्याने साहजिकच बारामतीकरांमध्ये उत्सुकता आहे. तीन वर्षांहून अधिक काळ नगरपरिषदेवर प्रशासक राज आहे, आपल्या समस्या प्रभावीपणे मांडून त्या मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांची आवश्यकता नागरिकांनाही गरजेची वाटू लागली आहे.
यंदा नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून जाणार असून पाच वर्षांसाठी हे पद असल्याने हे पद मिळविण्यासाठी इच्छुकांनी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी सुरु केली आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष घडयाळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता असून, त्यांना लढत देण्यासाठी इतर समविचारी पक्ष आघाडीच्या माध्यमातून मोट बांधणार असल्याचे दिसत आहे.
येत्या दोन तीन दिवसात या बाबतचे चित्र अधिक स्पष्ट होईल. नगरपरिषद निवडणूकीमध्ये एकास एक लढत क्वचितच होते, त्या मुळे यंदाही बहुरंगी लढती पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे.
इच्छुकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव केलेली असून पक्षीय स्तरावरही प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. या बाबत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रभागनिहाय अंतिम चित्र स्पष्ट होईल.
आचारसंहिता सुरु....
निवडणूक जाहिर झाल्याने आता आयोगाच्या निर्देशानुसार 24, 48 व 72 तासांमध्ये ज्या बाबी करणे गरजेच्या आहेत, त्या करण्याची प्रक्रीया पथके नेमून सुरु केल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.