नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचू लागला असून, आता वादग्रस्त विधान अन् वार-पलटवारांनी राजकीय मैदान गाजू लागले आहे. नगरांच्या निवडणुकीत वादाचे नगारे वाजत आहेत. आम्ही श्रीरामाचे अनुयायी, लंका आम्हीच जाळणार असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या टीकेवर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आक्षेपार्ह शब्दाबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागली. शिंदेसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी १ तारखेला बाहेर खाटेवर झोपा, लक्ष्मीदर्शन घडेल, असे वक्तव्य करून वादाला तोंड फोडले आहे.
वार : अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक
पलटवार : भाजपचा 'भरत'च लंका पेटविणार
गुलाबराव पाटील : १ तारखेला लक्ष्मी येणार आहे
आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे. मागच्यावेळी आमदारकीचे २१ तारखेला मतदान होते. १८ तारखेला लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली. ऊठ भक्ता काय झोपलाय, मी आलीये तुला प्रसन्न करायला. तुम्ही बाहेर खाटी टाकून झोपा. १ तारखेला लक्ष्मी येणार आहे. ऊठ भक्ता काय झोपलाय ऊठ. माझ्या तीन दशकांच्या आमदारकीत अनेक मुख्यमंत्री बघितले. रात्री दोनपर्यंत जागून लोकोपयोगी कामे आणि जीआर काढणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेच होते.