पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप

पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप

 

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहेत. पुणे शहराच्या मतदारयादीमध्ये तीन लाखांहून अधिक आणि पिंपरी चिंचवड शहरात ९२ हजारांपेक्षा अधिक बोगस मतदार आहेत. या मतदारयाद्या दुरुस्त करून दोषमुक्त कराव्यात आणि मगच निवडणूक घेण्यात यावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा उद्धवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांची बुधवारी पत्रकार परिषदेच दिला. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस शहर प्रमुख संजय मोरे आणि गजनान थरकुडे, माजी सभागृहनेता अशोक हरणावळ, वसंत मोरे, अनंत घरत उपस्थित होते.

अहिर म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दुबार नाव नाेंदणी झाली आहे. मुंबई महापालिकेमध्ये तर महापौरांचे नाव दुबार आहे. यासंदर्भात महाविकास आघाडी म्हणून भूमिका मांडली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीचे शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचीही भेट घेतली आहे. मात्र, निवडणूक आयोग जबाबदारी टाळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले असले तरी, महापालिकांकडे एवढे मनुष्यबळ आहे का, हा मोठा प्रश्न आहे. शहरातील अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागांत टाकण्यात आली आहेत. नाव आणि पत्त्यांमध्ये मोठी तफावत आहे. मतदारयादी अनेक चुका आहेत. त्यामुळे यादी दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये,’ असेही अहिर म्हणाले.