“आज एक व्यक्ती आपल्याबरोबर नाही”; धनंजय मुंडेंचं वक्तव्य; भरसभेत वाल्मिक कराडची आठवण काढल्याची चर्चा
परळी: राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. यातच राज्यात काही नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते मंडळी राज्यभरातील विविध शहरात जाऊन सभा घेत आहेत. नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर आज परळीत महायुतीची एक सभा पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मोठं भाष्य केलं. तसेच परळीच्या विकासाच्या मुद्यांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं. पण यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका विधानाची मोठी चर्चा रंगली आहे.
‘आज आपल्याबरोबर आपला एक व्यक्ती नाही’, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमकं अर्थ काय? याबाबत उलटसूलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी भर सभेत वाल्मिक कराडची अप्रत्यक्ष आठवण काढल्याची चर्चा आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
“१२ महिने जगमित्र (कार्यालय) सुरू होतं. जे काय असेल, नसेल आपण गोरगरिबांना मदत करत होतो. पण आज ९ ते १० महिने झाले, कार्यालय सुरू आहे. काम देखील सुरू आहे. पण हे सर्व बोलत असताना आपल्याबरोबर आपला एक व्यक्ती नाही, याची जाणीव पण होत आहे. माझ्या सारख्या एका कार्यकर्त्याला आणि सहकाऱ्याला सहकारी म्हणून आजच्या कार्यक्रमात मला याची जाणीव करून द्यावी लागते. काय चुकलंय, काय नाही ते न्यायालय पाहिलं. याची देखील जाणीव मला नक्कीच आहे”, असं धनंजय मुंडे यांनी सभेत बोलताना म्हटलं आहे.
सुषमा अंधारेंनी काय प्रतिक्रिया दिली?
“धनंजय मुंडे यांच्या बरोबर गेले अनेक वर्ष वाल्मिक कराड सावली सारखं वावरलेला माणूस आहे. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असो किंवा अजित पवारांच्या सभा असो किंवा परळीतील छोट्यातील छोटा कार्यक्रम असो किंवा मोठ्यातील मोठी सभा असो, याचं सर्व नियोजन हे वाल्मिक कराडकडे असायचं. आता हे देखील खरं आहे की एकेकाळी वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नव्हतं. त्यामुळे अशा व्यक्तीची नेमकं निवडणुकीच्या काळात आठवण येणं स्वभाविक आहे”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना दिली आहे.