“आम्ही निवडणुका जिंकतो कारण…”, रामनाथ गोएंका व्याख्यानात पंतप्रधान मोदींचे ‘या’ ७ मुद्द्यांवर भाष्य

“आम्ही निवडणुका जिंकतो कारण…”, रामनाथ गोएंका व्याख्यानात पंतप्रधान मोदींचे ‘या’ ७ मुद्द्यांवर भाष्य

 

नवी दिल्ली: सत्यकथन, उत्तरदायित्व आणि वैचारिकता यांची बांधिलकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रामनाथ गोएंका लेक्चर’मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार मांडले. नवी दिल्लीत निमंत्रितांच्या उपस्थितीत हे व्याख्यान सुरू आहे. यंदा या व्याख्यानाचे यंदा सहावे वर्ष आहे. या व्याख्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या ७ महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेऊया.

इंग्रजीला विरोध नाही, पण…

या व्याख्यानात वसाहतवादी मानसिकतेबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “कोणता देश स्वतःच्या भाषांवर टीका करतो? जपान, चीन, कोरिया यासारख्या देशांनी अनेक जागतिक कल्पना स्वीकारल्या पण भाषेशी कधीही तडजोड केली नाही. म्हणूनच आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषांमधील शिक्षणावर भर देण्यात आला आहे. आम्ही इंग्रजीला विरोध करत नाही, आम्ही भारतीय भाषांना पाठिंबा देतो. मॅकॉलेच्या गुन्ह्याला २०३५ मध्ये २०० वर्षे पूर्ण होतील, याला आजपासून दहा वर्षे आहेत. म्हणून आज, या व्यासपीठाच्या माध्यमातून, मी देशाला आवाहन करतो की, पुढील १० वर्षे या वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होण्याचा आपला संकल्प असू द्या. ही दहा वर्षे महत्त्वाची आहेत.”

स्वातंत्र्यानंतर, आपण आपल्या वारशाकडे दुर्लक्ष केले

“पर्यटन क्षेत्राकडे पहा. पर्यटन वाढणाऱ्या प्रत्येक देशाला आपल्या वारशाचा अभिमान असतो. स्वातंत्र्यानंतर, भारतात उलट घडले, आपण आपल्या वारशाकडे दुर्लक्ष केले. अभिमानाशिवाय, कोणतीही गोष्ट जपता येत नाही आणि त्या गोष्टी जपल्या नाहीत, तर वारसा नष्ट होतो. पर्यटन वाढीसाठी वारशाचा अभिमान आवश्यक आहे.”

…म्हणून आम्ही निवडणुका जिंकतो

“मीडियातील काही मोदी प्रेमींनी हे पुन्हा म्हणायला सुरुवात केली आहे की, भाजपा, मोदी २४ तास निवडणुकीच्या मानसिकतेतच असतात. पण मी म्हणतो की, निवडणूक जिंकण्यासाठी २४ तास निवडणुकीच्या मानसिकतेत असणे गरजेचे नसते, तर ‘इमोशनल मोड’मध्ये असणे गरजेचे असते. मनात हे सातत्याने येत असते की, गरीबांच्या कल्याणासाठी, गरीबांच्या रोजगार मिळवून देण्यासाठी आणि गरीबांच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी एक मिनिटही वाया घालवायचा नाही. या भावनेने काम करण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असते. याचे परिणाम आम्हाला निवडणूक निकालाच्या दिवशी पाहायला मिळतात.”

रामनाथ गोएंका यांनी जनसंघाचे तिकीट…

“एकदा कोणीतरी मला सांगितले होते की, विदिशा येथून रामनाथजींना जनसंघाचे तिकीट मिळाले होते. नानाजी देशमुख त्यांना म्हणाले होते, ‘तुम्हाला फक्त तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि नंतर जिंकल्यानंतर तुमचे प्रमाणपत्र घेण्यासाठी यावे लागेल.’ नानाजी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वतीने निवडणूक लढवली आणि त्यांचा विजय निश्चित केला. उमेदवारांनी फक्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी यावे असे सुचवण्यासाठी मी हे सांगत नाही, तर भाजपाच्या असंख्य समर्पित कार्यकर्त्यांच्या समर्पणाला उजाळा देण्यासाठी ही आठवण सांगत आहे.”

संपादकीय स्तंभ रिक्त ठेवणे दबावाचा प्रयत्न करणाऱ्या मानसिकतेला आव्हान देऊ शकते

“रामनाथ गोएंकाजी धैर्याने ब्रिटिश राजवटीविरुद्ध उभे राहिले. त्यांच्या एका संपादकीय मध्ये त्यांनी लिहिले होते की, ब्रिटिशांच्या आदर्शांचे पालन करण्यापेक्षा ते त्यांचे वृत्तपत्र बंद करणे पसंत करतील. त्याचप्रमाणे, जेव्हा देश आणीबाणीच्या अंधारात ढकलला गेला तेव्हा ते देशाला गुलाम बनवण्याच्या त्या प्रयत्नाचा प्रतिकार करण्यासाठी उभे राहिले. या वर्षी आणीबाणी उठवल्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आणि तरीही द इंडियन एक्सप्रेसने दाखवून दिले की, संपादकीय स्तंभ रिक्त ठेवणे लोकांना शांत करण्याचा आणि दबावाचा प्रयत्न करणाऱ्या मानसिकतेला आव्हान देऊ शकते.”

काँग्रेसचे ‘मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस’मध्ये रूपांतर

“गेल्या पाच दशकांपासून भारतातील जवळजवळ प्रत्येक राज्यात माओवाद्यांचा प्रभाव होता. परंतु दुर्दैवाने, काँग्रेसने भारतीय संविधानावर विश्वास न ठेवणाऱ्यांना पोसणे पसंत केले. काँग्रेसने प्रमुख संस्थांमध्ये ‘शहरी नक्षलवाद्यांना’ स्थान दिले. काँग्रेसमध्ये १०-१५ वर्षांपूर्वी रुजलेले शहरी नक्षलवादी-माओवादी वातावरण ‘मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस (एमएमसी)’ मध्ये रूपांतरित झाले आहे. आज मी पूर्ण जबाबदारीने सांगतो की, ‘मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस’ने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय हिताला दुय्यम स्थान दिले.”

शेजारच्या देशांमध्ये गृहकलह

“भारत विकसित होण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी अधीर आहे. आपण सर्वजण पाहत आहोत की २१व्या शतकाची २५ वर्षे किती वेगाने पूर्ण झाली आहेत. कित्येक आव्हाने आली, पण ती आव्हाने भारताच्या विकासाच्या वेगाला रोखू शकली नाहीत. आपण सर्वांनी पाहिले असेल, गेली ४–५ वर्षे संपूर्ण जगासाठी आव्हानात्मक ठरली आहेत. २०२० मध्ये कोरोना आला, त्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे संकट होते. यामुळे जगाच्या पुरवठा साखळीवरही परिणाम झाला, ज्यामुळे संपूर्ण जगात निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर ही परिस्थिती सावरू लागली, पण आपल्या शेजारी देशांमध्ये गृहकलह सुरू झाले. इतक्या सर्व गोष्टी घडत असतानाही आपल्या अर्थव्यवस्थेने सर्वोत्तम विकासदर प्राप्त केला.”