माजी नगरसेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा; ‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देण्याच्या आमिषाने २४ लाखांची फसवणूक

माजी नगरसेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा; ‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देण्याच्या आमिषाने २४ लाखांची फसवणूक

 

पुणे : सार्वजनिक सेवा सुविधांसाठी राखीव भूखंड (ॲमिनेटी स्पेस) मिळवून देण्याच्या आमिषाने हडपसरमधील महंमदवाडी येथील एका डॉक्टरांची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी माजी नगरसेविकेसह तिचे पती यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डाॅ. महेंद्र धोंडीराम सुरवसे (वय ३९, रा. महंमदवाडी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅ. सुरवसे यांचे महंमदवाडी परिसरात रुग्णालय आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या कालावधीत आरोपींना ‘ॲमिनेटी स्पेस’ मिळवून देणे, तसेच महानगरपालिकेची परवानगी मिळवू देतो, असे सांगितले होते. डाॅक्टरांकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी डॉक्टरांनी आपल्या पत्नीच्या आणि मित्राच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने २४ लाख २० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. मात्र, ठरलेली जागा न मिळवून न देता फसवणूक केली, असे डाॅ. सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या माजी नगरसेविका शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

विवाहाच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

विवाहाच्या आमिषाने तरुणीची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुण मूळचा नाशिकमधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि तरुणीची ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याची बतावणी करून त्याने तरुणीकडून पैसे घेतले. गेल्या आठ महिन्यांत आरोपीने तरुणीकडून वेळोवेळी सहा लाख रुपये घेतले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. व्यवसायातील अडचणींमुळे विवाह करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांत नुकताच तक्रार अर्ज दिला. त्यानंतर याप्रकरणात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करत आहेत.