आगामी निवडणुकांमध्ये मविआ मनसेला बरोबर घेणार? काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (११ नोव्हेंबर) मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादीसह (शरद पवार) मविआतील मित्रपक्षांचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे (उबाठा) विधान परिषद सदस्य अनिल परब, राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे या तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले, “मविआमध्ये कुठेही मतभेद असतील किंवा उमेदवाऱ्यांबाबत चर्चा करायची असेल तर आमच्यात एक समन्वय समिती असायला हवी याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. आमचे मित्रपक्ष व महाविकास आघाडीची राज्यस्तरीय समन्वय समिती असेल आणि प्रत्येक पक्षाचे समन्वयक यामध्ये असतील. कुठेही अडचण आल्यास, मतभेद निर्माण झाल्यास त्यावर मार्ग काढण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला दिले जातील. यासंदर्भात आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीला कसं सामोरं जायचं यावर सविस्तर चर्चा झाली.
मनसेला महाविकास आघाडीत घेणार का?
दरम्यान, यावेळी तिन्ही नेत्यांना विचारण्यात आलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेणार का? यावर शशिकांत शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीसमोर असा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर एकत्र बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ.” यावर काँग्रेसचं मत विचारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “मी प्रदेशाध्यक्ष म्हणून याआधीही सांगितलं आहे की चर्चेतून आम्ही निर्णय घेऊ.”
“मनसेला बरोबर घेण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रस्ताव आल्यास मविआ व इंडिया आघाडीचे घटकपक्ष म्हणून आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि सर्व घटकपक्ष मिळून निर्णय घेऊ. आम्ही महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र आहोत. आम्ही मागील दोन महत्त्वाच्या निवडणुका एकत्र लढलो आहोत. पुढेही एकत्र निवडणूक लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही राज्यात व देशात भाजपाशी दोन हात करत आहोत. मात्र, यादरम्यान, आमच्यात समन्वय साधण्यासाठी समन्वय समिती असणं आवश्यक आहे. याद्वारे येत्या काळातील तक्रारी किंवा ज्या अडचणी असतील त्यासाठी एक संवादाचा मंच खुला असावा यासाठी समन्वयक समिती स्थापन करत आहोत. यासंदर्भात आज आमच्यात सर्वसमावेशक अशी चर्चा झाली.”
सपकाळ म्हणाले, “नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १७ नोव्हेंबर ही अखेरची तारीख आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही एकत्र येऊन चर्चा करणार आहोत. त्यावेळी मनसेबाबत प्रस्ताव आला तर आम्ही त्यावर चर्चा करू.