माळेगांव सहकारी साखर कारखान्याची या हंगामातील पहिली उचल जाहीर
माळेगांव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने २०२५–२६ हंगामातील उसाच्या गळितासाठी पहिली उचल म्हणून प्रतिटन ३३०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.
उपमुख्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील या कारखान्याचा एफ. आर. पी. या हंगामासाठी ३२७० रुपये प्रति टन इतका निश्चित झाला आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ३० रुपये जास्त म्हणजेच ३३०० रुपयांची आगाऊ रक्कम देण्यास संचालक मंडळाने संमती दर्शवली.
गेल्या काही दिवसांपासून सभासद शेतकऱ्यांमध्ये माळेगाव कारखाना साखरेच्या पहिल्या उचल रकमेबाबत काय भूमिका घेणार? याबाबत उत्सुकता होती. विशेषतः सोमेश्वर, छत्रपती सहकारी साखर कारखान्याने त्यांच्या उचल रकमेची घोषणा केल्यानंतर माळेगाव कारखान्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि शेवटी शेतकऱ्यांच्या हितासाठी ३३०० रुपये प्रति टन इतकी उचल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली. या घोषणेमुळे परिसरातील शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या हंगामी खर्चासाठी ही आगाऊ रक्कम महत्वाची ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.