बारामती बाजार समिती मध्ये हमीभावाने मका खरेदीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू
बारामती: बाजार आवारात लिलावात सर्वसाधण दर्जा असलेल्या मकाचा दर हमीभावापेक्षा कमी निघत असल्याने बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शासनाकडे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत मागणी केली होती.
भरडधान्य (मका) खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे मार्केटिंग फेडरेशन, पुणे यांनी कळविलेले आहे. त्यानुसार ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे.
बारामती तालुका व पुणे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये भरडधान्य अंतर्गत हमीभावाने मका खरेदीची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असल्याचे नीरा कॅनॉल संघाचे चेअरमन सतीश काकडे यांनी सांगितले.
त्यानुसार मका नोंदणी मुदतीत करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा, असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.
दिलेल्या मुदतीनुसार शेतकऱ्यांनी बारामती येथील बाबालाल काकडे नीरा कॅनॉल संघात ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेल्या शेतकऱ्यांचीच मका खरेदी करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने मकाचा हमीदर रु. २४०० रुपये निश्चित केला आहे. शासनाचे निकषानुसार निश्चित केलेल्या दराप्रमाणे वाळलेली व स्वच्छ असलेला मका प्रतिएकर ९.५० क्विंटलप्रमाणे एफएक्यू दर्जाचा असल्याची खात्री करूनच खरेदी करण्यात येणार आहे.
- सातबारा उतारा, वर्ष २०२५-२६ चा पीकपेरा त्यात मकाची नोंद.
- आधारकार्ड आणि आयएफएससी कोडसह बँकेचे पासबुक झेरॉक्स.
- मोबाईल नंबर ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.