छत्रपती कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर

छत्रपती कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर

 

बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केल्यानंतर तशा अर्थाने अडचणीतील छत्रपती कोणता दर जाहीर करणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष होते. आज संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्यासह सर्व संचालकांनी एकमताने चालू हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांना प्रतिटन ३१०१ रुपये पहिला हप्ता जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून या जाहीर होणाऱ्या दराकडे संपूर्ण कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष होते. जानेवारीत ज्या खोडव्याची तोड होणार आहे त्याला शंभर रुपयांचे प्रति टन अनुदान जास्त दिले जाणार आहे. त्यामुळे खोडवा उसासाठी ३२०१ रूपये पहिला हप्ता मिळणार आहे.

या कारखान्याचा पहिला हप्ता काय निघतो याकडे सर्वांचेच लक्ष होते. संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी हा हप्ता जाहीर केला. दुसरी गोष्ट म्हणजे यावेळी कामगारही तेच, ऊसतोड मजूरही तेच आहेत, मात्र बदललेल्या संचालक मंडळामुळे कारखान्याने पहिल्या दिवसापासूनच ऊस गाळप आणि साखर उत्पादनाला जोर धरला.

काल कारखान्याने उच्चांक करत ८६०० टन प्रतिदिन गाळपाचा आकडा गाठला. छत्रपती कारखाना दररोज नवनवे विक्रम करत असल्याने सभासदही या कामगिरीवर खुश आहेत. त्यातच आज संचालक मंडळाने सभासदांना अपेक्षित उसाचा दर जाहीर केल्याने कारखान्याच्या एकूण गाळपावरही त्याचा अनुकूल परिणाम दिसणार आहे. विशेष म्हणजे हा पहिला हप्ता आहे आणि पहिल्यांदाच कारखान्याच्या सभासदांना या पुढील काळातही दर मिळणार आहे.

छत्रपती कारखान्याचे आजपर्यंत २ लाख १६ हजार टन उसाचे गाळप झाले असून, साखर उत्पादन २ लाख १२ हजार क्विंटल झाले आहे. साखर उतारा सध्या १०.२२ टक्के सरासरी असून दररोजचा साखर उतारा हा ११.०९ टक्के एवढा गाठला आहे. गतवर्षी याच काळात ५० हजार टन उसाचे उत्पादन झाले होते आणि साखर उतारा ८.७५ टक्के होता. आता या हंगामात कारखान्याने दुहेरी गाळपाचा आकडा गाठला आहे.

अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार हा हप्ता जाहीर केला असून, तो दहा डिसेंबर रोजी पहिला हप्ता सभासदांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. जो हप्ता ऊस उत्पादक सभासदांना जाहीर केला आहे, तोच गेटकेधारकांनाही दिला जाणार आहे. सध्या सभासदांचा 80 टक्के ऊस गाळप होत असून, १२ लाख टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. हा गाळपाचा उद्दीष्टाचा आकडा आम्ही गाठला, तर सभासदांना अधिक दर देणे शक्य होणार असल्याचे देखील जाचक यांनी सांगितले.